विनाश काले विपरीत बुद्धी म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना भास्कर जाधवांनी चांगलंच सुनावलं, ‘केसाने गळा कापला…’

मुंबई तक

• 08:12 AM • 28 Aug 2022

संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेने युती केल्यापासून विविध स्तरावरून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून टीका होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीबद्दल बोलताना समाजामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत, याची प्रचिती पुढे येणाऱ्या काळात दिसून येईल, असं म्हणाले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाश काले विपरीत बुद्धी अशी प्रतिक्रिया दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेचे आमदार […]

Mumbaitak
follow google news

संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेनेने युती केल्यापासून विविध स्तरावरून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून टीका होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीबद्दल बोलताना समाजामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत, याची प्रचिती पुढे येणाऱ्या काळात दिसून येईल, असं म्हणाले होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाश काले विपरीत बुद्धी अशी प्रतिक्रिया दिली होती. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी चांगलाच समाचार घेतला.

हे वाचलं का?

‘शिवसेनेचा केसाने गळा कापला’ : भास्कर जाधव

भास्कर जाधव यांना पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवर प्रश्न विचारला. यावर बोलताना जाधव म्हणाले, संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांना मनापासून धन्यवाद देतो. गेली 25-30 वर्ष शिवसेनेने मोठ्या विश्वासाने एका पक्षाच्या खांद्यावर मान ठेवली. त्या पक्षाने शिवसेनेचा केसाने गळा कापला, असा भाजपावर त्यांनी आरोप केला.

देवेंद्र फडणवीसांचा घेतला समाचार

अनेक अनेक पक्षाबरोबर युती केली. परंतु शिवसेनेने एकाच पक्षाबरोबर युती केली. आज जे कुणी म्हणतात की, विनाश काले विपरीत बुद्धी, त्यांनी विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष, महादेव जानकर यांच्या रासपसोबत, सदाभाऊ खोत यांच्यासोबत युती केली. परंतु त्यांची अवस्था काय केली हे सगळे बघत आहेत, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले, शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो मैत्रीला आणि दिल्या शब्दाला जागणारा आहे.

‘शिवसेनेने यापूर्वीच अनेक मित्र गोळा करायला पाहिजे होते’ : भास्कर जाधव

संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीवर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, खरं तर शिवसेनेने आधीपासूनच आपले अनेक मित्र गोळा करायला पाहिजे होते. जर शिवसेनेने तशे मित्र गोळा केले असते तर आज ज्या मित्राने केसाने गळा कापला त्याचं दुःख इतकं झालं नसतं, असं भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे. ज्याप्रमाणे संभाजी ब्रिगेडसोबत युती केली तशी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पक्षांसोबत युती करावी, असे आपले मत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवले.

दसरा मेळाव्याबद्दल काय म्हणाले भास्कर जाधव?

शिवसेना देशातला सगळ्यात मोठा पक्ष. 56 वर्ष दसरा मेळावा घेऊन या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेला एक चिन्ह, एक झेंडा, एक विचार असलेला शिवसेना पक्ष, असा दावा भास्कर जाधव यांनी केलाय. तसंच शिवसेना हा प्रखर हिंदुत्ववादी पक्ष आहे. कुणीही या निखाऱ्यात हात टाकण्याचा प्रयत्न करू नये. प्रयत्न करणाऱ्यांच्या राजकीय जीवनाची राख होईल, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.

    follow whatsapp