मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत गुरुवारी तब्बल १०३ दिवसांनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याभेटीसाठी ‘मातोश्री’ बंगल्यावर पोहचले. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी राऊतांचे स्वागत केले. राऊत आले तेव्हा स्वतः आदित्य ठाकरे त्यांच्या स्वागतासाठी मातोश्रीच्या गेटवर उपस्थित होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी घट्ट मिठी मारुन त्यांचं स्वागत केलं. तर उद्धव ठाकरे यांनीही राऊत यांची गळाभेट घेतली. रश्मी ठाकरे यांनी औक्षण करुन राऊत यांचं स्वागतं केलं. यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने राऊत-ठाकरे कुटुंबातील भावनिक संबंध अनुभवले.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांना ठाकरे कुटुंबातील तीन पिढ्यांच्या जवळचे नेते म्हणून ओळखलं जातं. याचा प्रत्यय आज राऊत ‘मातोश्री’ वर पोहचल्यानंतर आला. राऊत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही अत्यंत निकटवर्तीय नेते होते. बाळासाहेब ठाकरे यांनीच राऊत यांना पहिल्यांदा राज्यसभेवर पाठविलं. तसंच सामनाचं संपादकपदही दिलं. पुढे त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशीही अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध राहिले. त्यानंतर आज आदित्य ठाकरे यांच्याशीही राऊत यांचे भावनिक संबंध असल्याचं दिसून आलं.
संजय राऊत यांची न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर करत तुरुंगातून सुटका केली. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता ते ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. संजय राऊत यांचं स्वागत तिथे जमलेल्या हजारो शिवसैनिकांनी केलं. त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांसोबत जाऊन सिद्धिविनायक मंदितात आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीचं दर्शन घेतलं. तर आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.
काय म्हटलं संजय राऊत यांनी?
या भेटीनंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरे या तिघांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेसाठी मला दहावेळा तुरुंगात जावं लागलं तरीही जाईन, असं म्हणतं तुरुंगात जाण्यास घाबणार नसल्याचं सांगितलं. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना एकच आहे. गट वगैरे काहीही नाही. शिवसेना हे एक कुटुंब आहे आणि उद्धव ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील या विश्वासामुळेच मी तुरुंगात असूनही निश्चिंत होतो.
शिवसेनेसाठी मला दहावेळा तुरुंगात जावं लागलं तरीही जाईन. पक्षासाठी काम करण्याची संधी मिळाली तर मागे पुढे पाहणार नाही. पक्षाने मला ४० वर्षांमध्ये भरभरून दिलं आहे. मी पक्षाशी बेईमानी करणारा नाही. स्वतःची सुटका करून घ्यायची म्हणून पक्षाच्या पाठित खंजीर खुपसणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT