भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दीक युद्ध रंगलं आहे. देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटे झालेल्या शपथविधी सोहळ्यावरुन दोघांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता या वादात शिवसेनेने उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखातून, अजित पवार आमदारांच्या समर्थनाचं पत्र चोरत असताना टॉर्च मारायला भाजपची कोण-कोण लोकं होती याचा खुलासा आता व्हायला हवा असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
अजित पवारांनी ५४ आमदारांच्या सहीचं पत्र चोरणं नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणं हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचं लक्षण आहे. चंद्रकांत पाटलांनी आ बैल मुझे मार असंच केलं आहे. अजित दादा मोठ्या पवारांच्या ड्रॉव्हरमधून पत्र चोरत असताना त्या काळोख्या खोलीत टॉर्च चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांसोबत भाजपचे कोण-कोण लोकं होते याचाही खुलासा आता व्हायला हवा. एक संशयास्पद, गोपनिय विषय बंद पेटीत पडला होता, त्याचं टाळं चंद्रकांत दादांनी उघडलं. भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर लेटर बॉम्ब टाकला खरा पण तो त्यांच्यात हातात फुटला असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत दादांवर निशाणा साधला आहे.
किरकोळ चोऱ्यामाऱ्या करुन राजकीय गुजराण करणारे अजित पवार नाहीत. पहाटे त्यांनी एक प्रयोग केला, पण तो फसला. असे प्रयोग देशाच्या राजकारणात होत असतात. अजितदादांची आमदारांच्या समर्थनाचं पत्र चोरलं हा पाटलांचा दावा मान्य केला तरीही चोरलेलं पत्र भाजप नेत्यांनी स्विकारलं, त्यावर विश्वास ठेवून राज्यपालांकडे सुपूर्द केलं, त्या चोरलेल्या पत्राच्या आधारावर राजभवनात सरकार स्थापन करुन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं हे देखील बेकायदेशीरच ठरतं असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
ADVERTISEMENT