शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सामना या वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी हे स्वतःला फकीर म्हणवतात, मग दिल्लीत सध्या त्यांनी १५ एकरात घर बांधण्याचा उपद्व्याप कशासाठी चालवला आहे असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
नवी दिल्लीमध्ये संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामावरुन सध्या चांगलाच वाद रंगतो आहे. कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था नाजूक परिस्थितीत असताना या खर्चाची गरज आहे का असा सवाल विरोधीपक्ष विचारतो आहे. मध्यंतरी दिल्ली हायकोर्यातही याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊतांनीही याच मुद्द्यांवरुन मोदींना प्रश्न विचारला आहे.
“ब्रिटनच्या पंतप्रधानांनी कोरोना काळात तिसरे लग्न केले. ब्रिटनमध्ये कोरोना नियंत्रणात आला नाही तर जॉन्सनसाहेब वेळ घालवण्यासाठी चौथ्यांदा किंवा पाचव्यांदाही बोहल्यावर चढतील. इकडे दिल्लीत कोरोनो काळात नवे संसद भवन, पंतप्रधानांसाठी १५ एकरात नवे घर, उपराष्ट्रपतींसाठी नवे घर उभारले जात आहे. ही सर्व नवीन घरं कोरोना विषाणूप्रूफ आहेत का याचा केंद्राने खुलासा करावा. पंतप्रधान स्वतःला फकीर म्हणवतात पण हा उपद्व्याप फकिरीत बसत नाही”, असं म्हणून संजय राऊतांनी मोदींवर टीका केली आहे.
राज्यकर्त्यांनी घर बांधले तर त्यात लोकांना काय मिळणार? कोरोनामुळे देशातली ९७ टक्के जनता ही गरिबीच्या उंबरठ्यावर आहे. एप्रिल २०२० मध्ये १३ कोटी लोकांचा रोजगार बुडाला आहे, सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नोकऱ्याही लोकांनी गमावल्या आहेत. सर्वकाही बंद आहे मात्र स्माशनं आणि कब्रस्थानं २४ तास उघडी आहेत असं म्हणत संजय राऊतांनी कोरोना परिस्थितीच्या हाताळणीवरुन मोदींना खडे बोल सुनावले.
ADVERTISEMENT