Rahul Kalate यांना मिळणारी मतं कोणाचा करणार गेम? की होणार स्वतः आमदार?

मुंबई तक

10 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:04 AM)

Chinchwad by poll 2023 Rahul Kalate : पिंपरी-चिंचवड : “मला जनतेचा पाठिंबा आहे त्यामुळे निवडणूक लढवणारच. माझ्याबाबत लोकांमध्ये सहानभूती आहे. त्यामुळे मला उमेदवारी द्यायला हवी होती. आता ही निवडणूक जनताच हातात घेईल”, असं म्हणतं चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत (Chinchwad Assembly by poll) शिवसेना (UBT) चे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली […]

Mumbaitak
follow google news

Chinchwad by poll 2023 Rahul Kalate :

हे वाचलं का?

पिंपरी-चिंचवड : “मला जनतेचा पाठिंबा आहे त्यामुळे निवडणूक लढवणारच. माझ्याबाबत लोकांमध्ये सहानभूती आहे. त्यामुळे मला उमेदवारी द्यायला हवी होती. आता ही निवडणूक जनताच हातात घेईल”, असं म्हणतं चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत (Chinchwad Assembly by poll) शिवसेना (UBT) चे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली आहे.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्यामुळे सकाळपासूनच राहुल कलाटेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. यासाठी थेट शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली होती. याशिवाय पक्षाचे पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनीही ठाकरेंचा मेसेज कलाटेंपर्यंत पोहवला होता. मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळे आता कलाटे यांना मिळणारी मतं कोणाचा गेम करणार? की ते स्वतः आमदार होणार? असा सवाल विचारला जात आहे. त्यापूर्वी कलाटे यांची ताकद किती आहे ते पाहणं महत्वाचं ठरतं.

Chinchwad Bypoll: ठाकरेंचा शब्दही कलाटेंनी मोडला, शेवटच्या क्षणी केली मोठी घोषणा

कोण आहेत राहुल कलाटे?

राहुल कलाटेंची चिंचवडचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखं आहे. मूळचे बांधकाम व्यावसायिक असलेले कलाटे राजकारणाच्या सुरुवातीपासूनच शिवसैनिक आहेत. शहराध्यक्ष, उपनेता अशी पद त्यांनी भूषविली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक, शिवसेनेच्या गटनेतेपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. या काळात त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणूक देखील लढवली.

२०१४ ला कलाटे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत ६३ हजार ४८९ मतं मिळवली होती. तर त्यावेळी नाना काटे यांनीही राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना ३ नंबरची मत मिळाली होती. त्यावेळी भाजपकडून लक्ष्मण जगताप यांनी कलाटे यांचा तब्बल १ लाख २३ हजार मतं घेत ६० हजार मतांनी विजय मिळवला होता.

त्यानंतरच्या काळात २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेत युती होती. परिणामी कलाटे यांनी बंडखोरी करुन भाजपच्या लक्ष्मण जगतापांसमोर आव्हान उभं केलं होतं. त्यावेळी राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचितचा पाठिंबा मिळवला होता. राष्ट्रवादीने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे १ लाख १२ हजारांहून अधिक मतं मिळाली होती.

Chinchwad पोटनिवडणुकीत नवा ड्रामा, अजितदादांचंही ऐकण्यास नकार; कलाटेंचं बंड

आताची राजकीय परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. आता शिवसेनेत फाटाफूट झाली आहे. भाजप – शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवतं आहेत. तर राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट आणि वंचित असे मिळून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कलाटे यांना कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नाही. २०१४ सारखे ते शिवसेनेकडून नाहीत. तर २०१९ सारखं त्यांना कोणाचा पाठिंबाही नाही. त्यामुळेच आता एकांडे पडलेले कलाटे कोणत्या पक्षाची मतं घेऊन कोणाचा गेम करणार की ते स्वतः जनतेच्या मदतीने आमदार होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    follow whatsapp