गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियन प्रकरणावरून भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतही त्यांनी हा दावा केला की दिशा सालियनवर बलात्कार करण्यात आला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. नितेश राणे यांनीही यासंदर्भातले काही ट्विट केले होते. तसंच चंद्रकांत पाटील यांनीही टीका केली होती. त्यावरून आता पुन्हा एकदा शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. राजकीय बदनामीचा बलात्कार करणाऱ्यांना धडा शिकवा असं शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
दिशा सालियनची 8 जूनला बलात्कार करून हत्या करण्यात आली, नारायण राणेंचा पुन्हा आरोप
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
‘खून आणि बलात्कार यावर भाजपचे लोक अलीकडे अधिकारवाणीने बोलताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याकामी पुढाकार घेतला असून मृत महिलांची यथेच्छ बदनामी सुरू केली आहे. दिशा सालियन या तरूणीची आत्महत्या सगळ्यांनाच अस्वस्थ करून गेली. दिशा सालियन तिच्या एका मित्रासोबत पार्टीत गेली होती. त्यानंतर तिने स्वतःला गॅलरीतून झोकून दिलं आणि आत्महत्या केली. दिशाच्या आत्महत्येचा संबंध सुशांतसिंह राजपूत प्रकरणाशी जोडण्याचाही प्रयत्न झाला. त्याबाबत अनेक कथा आणि उपकथानकांचा जन्म झाला. या सर्व प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस आणि सीबीआयने केला. त्यातून सर्व आरोप आणि संसयांना उत्तरं मिळाली. दिशावर मृत्यूपूर्वी बलात्कार झाला असे त्यावेळीही राजकीय लोकांनी उठवले. मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्ट ते सांगत नाही.’
‘असं असूनही भाजपचे नेते मनाला येईल तसे बरळत आहेत. मुलींची मृत्यूनंतरही बदनामीच करत आहेत. केंद्रीय मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने तरी किमान याबाबत बोलताना भान राखलं पाहिजे. चंद्रकांत पाटील यांच्याबाबत ही अपेक्षा ठेवता येणार नाही. या लोकांना गरळ ओकण्याचा भस्म्यारोग जडला आहे. त्यामुळे दिशा सालियनच्या आई वडिलांना जगणं कठीण झालं आहे. राणे आणि पाटील यांच्या वक्तव्यानंतरही दिशाच्या माता-पित्यांनी सांगितलं की घाणेरडं राजकारण थांबवा. आम्ही आमची एकुलती एक मुलगी गमावली आहे. तिची अशी बदनामी करू नका. एक बिझनेस डिल तुटल्याने आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली हेदेखील त्यांनी सांगितले. तरीही तिची बदनामी केली जाते आहे. असं झाल्यास आम्हालाही आत्महत्या करावी लागेल आणि त्याची जबाबदारी बदनामी करणाऱ्या राजकीय नेत्यांची असेल.’
दिशा सालियन : राणेंच्या अडचणी वाढणार?; महिला आयोग ‘अॅक्शन मोड’मध्ये, पोलिसांना दिले आदेश
‘महाराष्ट्राने लेकी सुनांचा सदैव सन्मान केला. त्यांच्या सुरक्षेसाठी पराकाष्ठा केली. सावित्रीच्या लेकी म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. लेकींवर अन्याय करणाऱ्यांची गय केली जात नाही. महाराष्ट्राला मन आहे आणि लेकी सुनांच्या बाबतीत ते हळवे आहे. सत्तेच्या खुर्च्या उबवून ज्याच्या शरीरात अहंकाराची गर्मी निर्माण झाली आहे त्यांच्या संवेदना मरण पावल्या आहेत. त्यामुळेच दिशा सालियनची मृत्यूनंतर बदनामी केली जाते आहे. महाराष्ट्रद्वेष्ट्या भाजप पुढाऱ्यांना कठोर शब्दात हाणलं की भाजपमधील ज्या बाई माणसांचा थयथयाट सुरू होतो त्या आता या अबलेच्या मृत्यूनंतर होणाऱ्या बदनामीबाबत गप्प का ? कायद्याने गप्प बसू नये. राजकीय बदनामीचा बलात्कार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी.’
ADVERTISEMENT