जळगावचे शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर 4 ते 5 जणांनी कारने पाठलाग करून गोळीबार केल्याची घटना रविवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी कुलभूषण पाटील यांचा पाठलाग करताना एक, तर त्यांच्या पिंप्राळा परिसरातील घराजवळ तीन असे चार राऊंड फायर केले. सुदैवाने या हल्ल्यात पाटील बचावले आहेत. क्रिकेट खेळताना दोन गटात झालेल्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून उपमहापौर पाटील यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात 4 ते 5 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे नेमका प्रकार?
जळगाव शहरातील पिंप्राळा उपनगरात रविवारी दुपारी क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला होता. त्यावेळी दोन्ही गट परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा या वादात मध्यस्थी करण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील हे गेले होते. त्यांनी दोन्ही गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्यांनी एकाच गटाची बाजू घेतल्याचा आरोप करून त्यांना काही तरुणांनी शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास कुलभूषण पाटील हे त्यांचे सहकारी अनिल यादव यांच्यासह आपल्या संपर्क कार्यालयातून घरी दुचाकीने जात होते.
तेव्हा कारने त्यांचा पाठलाग करणाऱ्या तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पाटील यांनी घराच्या दिशेने दुचाकी पळवली. त्यानंतर घरी आल्यावर त्यांच्यावर हल्लेखोरांनी पुन्हा 3 राऊंड फायर केले. सुदैवाने या हल्ल्यात पाटील हे बचावले असून, त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.
काय म्हणाले उपमहापौर
क्रिकेटच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. ते दोन्ही गट पोलीस ठाण्यात गेले. तिथे मी त्यांना समाजावून सांगण्याचा प्रयत्न केला की भांडण आणि वाद जो काही झाला असेल तो आपसात मिटवा. तिथे या दोन्ही गटातल्या लोकांनी मला शिवीगाळही केली. पण मी काहीही बोललो नाही मी त्यावर शांत राहिलो आणि त्यांना वाद सोडून द्या असं सांगितलं. मी तिथून निघून गेलो. त्यानंतर मी ऑफिसला गेलो तिथेही फोन करून त्यांनी मला शिवीगाळ केली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला शिवीगाळ करणार असाल तर मला पोलीस स्टेशनला जावं लागेल. त्यावर त्यांनी मला धमकी दिली की पोलीस स्टेशन असो की काही असो आज तर आम्ही तुला मारणारच आहोत. आज तुझा गेम करणारच आहे असं म्हणून त्यांनी माझा फोन कट केला. मी घराच्या दिशेने रात्री आलो तेव्हा आधी त्यांनी एक गोळी झाडली. मी पळ काढल्यानंतर घराच्या दिशेने त्यांनी तीन राऊंड फायर केले. मात्र सुदैवाने मला गोळी लागली नाही. गोळ्यांचा आवाज ऐकून जेव्हा कार्यकर्ते जमा झाले तेव्हा त्यांनी इथून पळ काढला. असं उपमहापौरांनी सांगितलं आहे,
ADVERTISEMENT