नवी दिल्ली : श्रद्धा वालकरची भयंकर आणि क्रूर हत्या हा मागील काही दिवसांतील देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्ली पोलिसांना आत्तापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाच्या ३५ तुकड्यांपैकी १३ तुकडे मिळाले आहेत. हे मृतदेहाचे तुकडे हे महिलेचे आहेत असं पोलिसांना वाटतं आहे. परंतु डीएनए चाचणी झाल्यानंतरच या संबंधी भाष्य अधिकृत भाष्य करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
अशातच याबाबत केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी अशा प्रकरणांना शिक्षित मुलीच जबाबदार असतात, असं वादग्रस्त विधान केलं आहे. तसंच या सर्व प्रकरणात श्रद्धाची चुकी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. कौशल किशोर यांचं हे वक्तव्य अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद असल्याची टीका महिला काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा निती डिसूजा यांनी केली आहे. तसंच डिसूजा यांनी याबाबत स्मृती इराणी यांना भाष्य करण्याचं आव्हान दिलं आहे.
काय म्हटलं कौशल किशोर यांनी?
न्यूज 18 ला दिलेल्या व्हिडीओ बाईटमध्ये मंत्री कौशल किशोर म्हणाले, ही मुलींचीही जबाबदारी आहे. ज्यांना त्यांच्या पालकांनी वाढवले, ते त्यांच्या पालकांना क्षणात सोडून जातात. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं याचा अर्थ काय होतो? लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे असेल, तर त्यासाठी योग्य नोंदणी व्हायला हवी. तुमचे पालक त्यासाठी तयार नसतील तर आधी कोर्ट मॅरेज करा. या सर्व घटना शिकलेल्या मुलींसोबत घडत आहेत. ज्या मुली स्वतःला आपण खूप फ्रँक असल्याचं, मी प्रौढ झालं असल्याचं सांगतात. माझ्यात निर्णय घेण्याची क्षमता असल्याचं सांगतात, त्याच या प्रकरणांमध्ये अडकतात.
यावर रिपोर्टरने मंत्र्यांना पुन्हा विचारलं की, याचा अर्थ सुशिक्षित मुली स्वतः यात जास्त जबाबदार आहेत? त्या स्वतःच अडकतात का? मंत्री उत्तरात म्हणतात, अगदीच. त्याच पूर्णपणे जबाबदार आहेत. आता हिच घटना घ्या. तिच्या पालकांनी नकार दिला. वडिलांनी तिला खूप समजावलं. पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. शिकलेल्या मुलीनेच तर निर्णय घेतला, जबाबदारी घेतली. पण या सर्वात मुलींनी अडकू नये. आधी लग्न करावं. लिव्ह इनने काय होतं? या पद्धतीमुळे गुन्हेगारीला चालना मिळते. हा चुकीचा मार्गही आहे. याचे दुष्परिणाम लोकांना भोगावे लागतात, असं होऊ नये हे माझं मत आहे.
ADVERTISEMENT