अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. ही बाब सगळ्या मनोरंजन विश्वालाच हादरवून टाकणारी ठरली आहे. मात्र रात्री काय घडलं याचा घटनाक्रम आता समोर आला आहे. रात्री उशिरा सिद्धार्थला झोपेतून जाग आली होती. त्याने त्याच्या आईला हाकही मारली होती. पोलीस सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. वाचा नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
पहाटे 3/3.30 च्या दरम्यान सिद्धार्थ शुक्ला झोपेतून जागा झाला होता. त्याला खूपच अस्वस्थ वाटत होतं. त्याने आईला हाक मारली आणि आपल्याला अस्वस्थ वाटत असून छातीत दुखतंय असं त्याने आईला सांगितलं. त्यानंतर आईने सिद्धार्थला पाणी प्यायला दिलं. सिद्धार्थ त्यानंतर झोपला.
सकाळ झाल्यानंतर आईने सिद्धार्थला हाक मारली, मात्र त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्याच्या बहिणीनेही त्याला हाक मारली मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर सिद्धार्थच्या आईने आणि बहिणीने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केलं.
सकाळी 9.40 च्या दरम्यान सिद्धार्थला अँब्युलन्समधून कूपर रुग्णालयात आणलं गेलं. त्यावेळी त्याची बहीण, बहिणीचे पती, चुलत भाऊ आणि तीन मित्र सोबत होते. सकाळी 10.15 ला सिद्धार्थ शुक्लाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्याची डेडबॉडी तीनवेळा तपासण्यात आली. कोणतीही इजा किंवा चुकीचं काहीही आढळलेलं नाही.
दुपारी 3.45 ला शवविच्छेन करण्यास सुरूवात झाली. दोन पोलिसांनी या प्रक्रियेचं व्हीडिओ चित्रीकरण केलं. मुंबई पोलीस या ठिकाणी साक्षीदार म्हणूनही उपस्थित होते. डॉक्टरांच्या एका पथकाने सिद्धार्थच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम केलं. सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू हे संवेदनशील प्रकरण असल्याने डॉक्टरांनी दोन ते तीन वेळा मृतदेह तपासला. संध्यकाळी सहाच्या सुमारास हे पोस्टमॉर्टेम संपेल.
आत्तापर्यंत सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी कुठलाही संशय किंवा शक्यता व्यक्त केलेली नाही. सगळ्यांचे जबाब नोंदवून झाल्यानंतर सिद्धार्थचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. सिद्धार्थ कसली औषधं घेत होता? त्याने झोपण्यापूर्वी कोणती औषधं घेतली होती याचा तपास आता पोलीस करत आहेत.
सिद्धार्थ शुक्ला हा फ्लॅट नंबर 1204 मध्ये राहात होता. बुधवारी सिद्धार्थ एका प्रोजेक्ट मिटिंगसाठी बाहेर गेला होता. त्यानंतर तो रात्री 8 वाजता घरी आला. रात्री 10 वाजता तो जॉगिंगला गेला होता, इमारतीच्या कपाऊंडमध्ये त्याने थोडावेळ जॉगिंग केलं. त्यानंतर तो घरी आला, त्याने थोडंसं खाल्लं त्यावेळीही सिद्धार्थला थोडं अस्वस्थ वाटत होतं.
त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आईने पाणी प्यायला दिलं होतं. सिद्धार्थ हा सातत्याने व्यायाम आणि ध्यानधारणा करत असे. तो रोज जवळपास 3 तास व्यायाम करत असे. सिद्धार्थची बहीणही याच इमारतीत राहात होती. त्याला रूग्णालयात नेण्यात आलं तेव्हा शेहनाज गिलही अँब्युलन्समध्ये होती असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
ADVERTISEMENT