एकीकडे राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होते आहे. सर्व महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना राज्य सरकारने काही ठिकाणी निर्बंध कडक केले असून काही भागात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत खुद्द उप-मुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पंढरपूर येथील सभेत गर्दीचे सर्व नियम उल्लंघन झाल्यामुळे पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि जयंत पाटील काही दिवसांपूर्वी पंढरपुरात दाखल झाले होते. पंढरपूर येथील श्रीयश पॅलेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचार-विनीमय बैठक पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सौरभ मांडवे यांनी परवानगी घेतली होती. कोविडच्या सर्व नियमांचं पालन आणि ५० पेक्षा जास्त लोकं या सभेला उपस्थित राहणार नाहीत या आश्वासनावर कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती.
मात्र प्रत्यक्ष सभेत ५० पेक्षा अधिक लोकं हजर राहिल्यामुळे नियमांचं उल्लंघन झालं. त्यातच महाराष्ट्राच्या उप-मुख्यमंत्र्यांसमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्यामुळे ही बाब प्रामुख्याने प्रसारमाध्यमांमध्ये आली. यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. खूद्द नेत्यांच्या बैठकीत नियमांचं अशा प्रकारे उल्लंघन होणार असेल तर राज्याच्या इतर भागातली परिस्थिती कशी नियंत्रणात राहिल असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
ADVERTISEMENT