महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने १ मे पर्यंत कडक लॉकडाउनची घोषणा केली आहे. यात अत्यावश्यक सेवेतील दुकानं वगळता सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. या काळात लग्नसोहळ्यांसाठीही २५ माणसं आणि दोन तासांत सोहळा आटोपण्याचं बंधन राज्य सरकारने घालून दिलंय. परंतू जळगावात या सर्व नियमांचा भंग करुन लग्नसोहळ्यात गर्दी झाल्याचा प्रकार समोर आलाय. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लग्नमंडपात धडक कारवाई करत वधू-वर पित्यांना ५० हजारांचा दंड ठोठावला असून नियमांचा भंग केल्याप्रकरणी आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
जळगाव जिल्ह्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होते आहे. योगेश्वर नगर भागातील एका लग्नसोहळ्यात १०० पेक्षा जास्त लोकांची गर्दी जमल्याची माहिती महापालिकेच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं पहायला मिळालं. मंडपात जमा झालेल्या वऱ्हाडी मंडळींमध्ये सोशल डिस्टन्सिंग नावाचा प्रकार दिसत नव्हता. अनेकांनी महापालिकेचं पथक कारवाईला आल्यानंतर मास्क घातला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे याचसोबत लग्नसोहळ्याच्या जागेवर सॅनिटायजेशनची कोणतीही सोय इथे दिसली नाही. २५ माणसांची मर्यादा असतानाही १०० पेक्षा जास्त लोकं सोहळ्यासाठी हजर असल्यामुळे महापालिकेने आयोजकांवर गुन्हा दाखल करुन आर्थिक दंड ठोठावला आहे. एकीकडे राज्य सरकार सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका असं आवाहन वारंवार करत असताना नागरिकांकडून या आवाहनाला योग्य प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये.
ADVERTISEMENT