पावसाळी अधिवेशन वादळी ठरल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज संसदेतील विरोधी बाकावरील पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक बोलावली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे सोनिया गांधी यांनी संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधींनी विरोधकांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचा संदेश दिला.
ADVERTISEMENT
सोनिया गांधी यांनी देशातील विविध मुद्दे उपस्थित करत पावसाळी अधिवेशनात सरकारनं घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. त्याचबरोबर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाबद्दल घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं. पेगॅसस हेरगिरी, तीन कृषी कायदे, मोफत अन्नधान्य वाटप आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्यांना थेट मदतीच्या मुद्द्याचा सोनिया गांधी यांनी पुनर्रुच्चार केला.
याच बैठकीत सोनिया गांधी यांनी विरोधकांना २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याची सूचना केली. ‘भविष्यात संसदेत आणि संसदेबाहेरही लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी विरोधकांची एकजूट कायम राहावी. उद्दिष्ट २०२४ची लोकसभा निवडणूक असलं, तरी त्यासाठी आतापासूनच योजना आखण्यास सुरूवात केली पाहिजे. देशाला स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्ये आणि तत्वावर आणि संविधानावर विश्वास असणारं सरकार देण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून काम करायला हवं’, असं सोनिया गांधी म्हणाल्या.
‘हे आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. आपण हे एकजूटीने करू शकतो. हे आव्हान पेलावं लागणार आहे, कारण एकत्रित येऊन काम करण्याशिवाय पर्याय नाही. आपल्या सर्वांनाच स्वतःच्या विवशता आहेत. पण, हे बाजूला सारून आपण उभं राहणं ही देशाची गरज आहे. ती वेळ आली आहे. भारताच्या अमृत महोत्सवी वर्ष हे खऱ्या अर्थानं आपल्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर संकल्प करण्यासाठी चांगली संधी आहे. यानिमित्ताने मी असं सांगेन की यात अखिल भारतीय काँग्रेस कुठेही मागे नसेल’, असं म्हणत सोनिया गांधींनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचना सगळ्यांना केली.
१९ पक्षाच्या नेत्यांची हजेरी
सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला तब्बल १९ पक्षाचे नेते उपस्थित होते. यात काँग्रेसच्या नेत्यांसह तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, शिवसेना, झारखंड मुक्ती मोर्चा, सीपीआय, सीपीआय (एम), नॅशनल कॉन्फरन्स, राजद, एआययूडीएफ, लोकतांत्रिक जनता दल, जेडी(एस), आरएलडी, आरएसपी, केरळ काँग्रेस यांच्यासह १९ पक्षांनी बैठकीत सहभाग घेतला.
ADVERTISEMENT