देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रासह दिल्लीत देखील रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. यावर अनेक कलाकारांनी चिंता व्यक्त केलीये. तर आता बॉलिवूडचा गायक सोनू निगमने देखील यावर भाष्य केलं आहे. यावेळी सोनू निगमने कुंभमेळ्यावर देखील संताप व्यक्त केलाय.
ADVERTISEMENT
सोनू निगमने त्याचा एक व्हिडीओ रात्री तीन वाजता बनवला. हा व्हिडीयो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनू म्हणतो की, “मी दुसर्या कोणाबद्दल काही सांगू शकत नाही, मात्र हिंदू असल्याने मी नक्कीच असं सांगू शकतो की, यावेळी कुंभ मेळा नाही व्हायला हवा होता. आता हे चांगलं आहे की थोडीशी लवकर अक्कल आली आणि पुढे तो सिंबॉलिक पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलं आहे. मी त्यांच्या भावना समजतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या जीवनापेक्षा आणखी काहीही महत्त्वाचं नाही.”
सोनू पुढे म्हणतो, “तुम्हाला काय वाटतं आमचं मन होत नाही की शो करावा? पण मी समजतो की, आता सध्याच्या परीस्थितीत असे कार्यक्रम होऊ नये. एक गायक असल्याने मी असंही म्हणेन की, कदाचित सोशल डिस्टेंसिंग लक्षात घेऊन शो केले जाऊ शकतात. पण ही स्थिती अत्यंत बिकट आहे आणि आपण ही गोष्ट समजून घेतलीच पाहिजे.” याशिवाय सोनूने वरिष्ठ सहकारी तसंच त्यांची पत्नी कोरोनाची लढाई लढत असल्याचं सांगितलं.
यापूर्वी अभिनेत्री मलायका अरोरानेही हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या गर्दीवर आणि त्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर आपलं मत मांडलं होतं. ‘हे महामारीचे युग आहे, पण हे खूप धक्कादायक आहे’, असं मलायकाने म्हटलं होतं.
ADVERTISEMENT