Sri Lanka crisis : सोन्याची लंका कशी अडकली आर्थिक गर्तेत? काय आहेत कारणं?

मुंबई तक

• 03:25 AM • 11 May 2022

दोन वर्षापूर्वी दक्षिण आशियात सर्वाधिक मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या श्रीलंकेत मोठं संकट ओढवलं आहे. कोरोनाच्या आगमनापूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये जागतिक बँकेने श्रीलंकेला जगातील हाय-मिडल उत्पन्न देशांच्या श्रेणीत समाविष्ट केलं होतं. आता अवघ्या दोन वर्षात श्रीलंकेची अर्थव्यवस्था जमिनीवर आली आहे. परकीय कर्ज फेडण्यात श्रीलंका असर्मथ ठरली आहे. श्रीलंकेनं स्वतःला दिवाळखोर म्हणून घोषित केलं असून, सरकारी आकडेवारीनुसार […]

Mumbaitak
follow google news

दोन वर्षापूर्वी दक्षिण आशियात सर्वाधिक मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या श्रीलंकेत मोठं संकट ओढवलं आहे. कोरोनाच्या आगमनापूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये जागतिक बँकेने श्रीलंकेला जगातील हाय-मिडल उत्पन्न देशांच्या श्रेणीत समाविष्ट केलं होतं. आता अवघ्या दोन वर्षात श्रीलंकेची अर्थव्यवस्था जमिनीवर आली आहे.

हे वाचलं का?

परकीय कर्ज फेडण्यात श्रीलंका असर्मथ ठरली आहे. श्रीलंकेनं स्वतःला दिवाळखोर म्हणून घोषित केलं असून, सरकारी आकडेवारीनुसार श्रीलंकेत महागाई दर १७ टक्क्यांवर पोहोचला आहे. श्रीलंकेतील महगाई दर दक्षिण आशियात सर्वाधिक वाढला आहे.

चलन मूल्य घटलं…

श्रीलंकन रुपया डॉलरच्या तुलनेत प्रचंड कुमकुवत झाला, मागील काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपया ८० टक्क्यांनी घसरला आहे. मार्चमध्ये श्रीलंकेत एका डॉलरसाठी २०१ रुपये मोजावे लागत होते. त्यात वाढ झाली असून, आता एक डॉलर ३६० रुपयांवर पोहोचला आहे.

श्रीलंकेतील सरकारी आकडेवारीनुसार त्यांच्यावर २०२१ पर्यंत ३५ बिलियन डॉलरचं कर्ज होतं. एका वर्षात ते वाढून ५१ बिलियन डॉलरवर जाऊन पोहोचलं आहे.

निम्मं सोनं विकावं लागलं…

श्रीलंकेजवळ चलनाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. श्रीलंकेच्या केंद्रीय बँकेनं त्यांच्या सोन्या ठेवीतून निम्मं सोनं विकलं आहे. श्रीलंकन केंद्रीय बँकेकडे २०२१ च्या सुरूवातीला ६.६९ टन सोन्याचा साठा होता. त्यापैकी ३.६ टन सोनं विकावं लागलं आहे.

विदेशी गंगाजळी निम्म्यावर

२०१८ मध्ये श्रीलंकेकडे विदेशी गंगाजळी ७.५ बिलियन डॉलर इतकी होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये ती घटून २.३१ बिलियन डॉलरवर आली आहे. परकीय चलन साठा वाचवण्यासाठी श्रीलंकन सरकारने मार्च २०२० मध्ये परदेशी आयातीवर निर्बंध घातले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. उलट आयात बंदी केल्याने श्रीलंकेत आवश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला.

आयातीवरील निर्बंधांमुळे बिघडली परिस्थिती?

श्रीलंकन सरकारने परदेशी आयातीवर जेव्हा निर्बंध घातले. त्यामुळे रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर श्रीलंकन सरकारने सेंद्रीय शेती सक्तीची केली. याचा फटका बसला, कारण सेंद्रीय शेतीमुळे उत्पादन घटलं. सरकारच्या निर्णयामुळे श्रीलंकेतील कृषी उत्पन्न निम्म्यावर आलं.

परदेशातील वस्तूंच्या आयातीवर बंदी घातल्याने आणि सेंद्रीय शेतीमुळे श्रीलंकेत जीवनावश्यक साहित्याचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे किंमती भरमसाठ वाढल्या आणि श्रीलंकेत आर्थिक आणीबाणी लावण्याची परिस्थिती ओढवली.

कोरोनामुळ पर्यटनाला फटका

श्रीलंकेच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या क्षेत्रातून श्रीलंकेला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. पर्यटनावर ५ लाख नागरिक थेट, तर २० लाख अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत. पर्यटन क्षेत्रातून श्रीलंकेला वर्षाला ५ बिलियन डॉलर मिळतात, मात्र कोरोनामुळे या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे.

१०४ टक्के कर्ज

केंद्रीय बँकेनुसार श्रीलंकेवर एकूण ५१ बिलियन डॉलरचे विदेशी कर्ज आहे. जागतिक बँकेनुसार श्रीलंकेवर विदेशी कर्जाचं ओझ जीडीपीच्या १०४ टक्के इतकं आहे. श्रीलंकेला पुढील १२ महिने कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी ७.३ बिलियन डॉलरची गरज आहे. तर पुढील चार वर्षात म्हणजे २०२६ पर्यंत २६ बिलियन डॉलर फक्त परदेशी कर्जाचे हफ्त्यापोटी द्यावे लागणार आहेत.

    follow whatsapp