पदर पसरून मागितली भीक; राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं ‘भीक मांगो’ आंदोलन

मुंबई तक

• 09:53 AM • 26 Jan 2022

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनावर अजूनही तोडगा निघालेला नसून, मागील तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं आहे. त्यामुळे महामंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या पगारी करण्यात आलेल्या नसून, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ठिकठिकाणी पदर पसरत भीक मांगो आंदोलन केलं. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत आंदोलनाची हाक दिली. सरकारकडून दखल घेतली […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनावर अजूनही तोडगा निघालेला नसून, मागील तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं आहे. त्यामुळे महामंडळाकडून कर्मचाऱ्यांच्या पगारी करण्यात आलेल्या नसून, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ठिकठिकाणी पदर पसरत भीक मांगो आंदोलन केलं.

हे वाचलं का?

एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत आंदोलनाची हाक दिली. सरकारकडून दखल घेतली जात नसल्यानं कर्मचाऱ्यांनी बेमुद काम बंद आंदोलन सुरू केलं. सरकारकडून पगारवाढीसह काही मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र, महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम असून, आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही.

पगार बंद असल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत

प्रजासत्ताक दिनी एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यभरात जिल्हा तसेच तालुक्याच्या ठिकाणी भीक मांग आंदोलन करण्यात आलं. एस टी चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या तीन महिन्यांच्या काळात 70 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना सरकारची अजूनही विलिनीकरण करण्याची मानसिकता दिसत नाही, असं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

बुलडाणा आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी बुलडाणा शहरात भीक मागून आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांनी हातात झोळी आणि छातीवर विविध मागण्यांचे पोस्टर लावून शहरातील मुख्य चौकात भीक मागितली. एसटीचे शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही यावेळी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला.

जळगावात कर्मचारी सहकुटुंब आंदोलनात

जळगावात एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या नावे भीक मागितली. या आंदोलनात एसटी कर्मचारी कुटुंबासह सहभागी झाले होते. हातात थाळी घेऊन कर्मचाऱ्यांनी भीक मागितली. जळगावातील एसटी वर्कशॉप ते बस स्थानकापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांसह भीक मागितली. जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली जाणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

नांदेडातही आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलं असून, याचा निषेध करण्यासाठी नांदेडमध्येही एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले. नांदेड शहरात रस्त्यावर फिरून कर्मचाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केलं. ‘गेल्या तीन महिन्यापासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन एसटी महामंडळाने बंद केलं आहे. त्यामुळे आम्हाला आता जगण्यासाठी भीक मागण्याशिवाय पर्याय उरलेला नाही’, असं आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

    follow whatsapp