मागील काही महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराच्या दिशेनं मोर्चा वळवला. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. कर्मचारी आक्रमक झाले असून, सध्या घराबाहेर जोरजोरात घोषणाबाजी सुरू आहे. या दरम्यान चप्पलफेक करण्यात आल्याचाही प्रकार घडला आहे.
ADVERTISEMENT
मागील पाच महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आज थेट शरद पवार यांच्या घरावर धडक दिली. मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत हजर कामावर हजर होण्यास सांगितलं होतं. त्याचबरोबर दिलेल्या मुदतीत कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.
दरम्यान, आज (८ एप्रिल) दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक बाहेर आंदोलन सुरू केलं. एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर जोर देत निदर्शनं सुरू केलं. या दरम्यान काही आंदोलकांनी चप्पलफेक केल्याचाही प्रकार घडला. त्यानंतर आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
आंदोलन सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. “शांततेत बोलणार असाल, तर मी ऐकून घ्यायला तयार आहे. मी हात जोडून विनंती करते की, शांत बसा. मी ऐकून घ्यायला तयार आहे. याक्षणी मी चर्चा करायला तयार असून, शांततापूर्ण मार्गाने बोलूया,” असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केला.
दरम्यान, संपकरी एसटी कर्मचारी घोषणाबाजी सुरू राहिली. त्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “माझी मुलगी, आई-वडील इथे आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आई-वडिलांना पाहून येते आणि चर्चा करूया. गोंधळ थांबला, तर लगेच येऊन चर्चा करेन,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांच्या आवाहनानंतरही आंदोलकांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. या आंदोलनामागे गुणरत्न सदावर्ते आणि भाजप असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT