मुंबई: ‘भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. दोन्ही पक्षांची चूक आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावं. ही माझी प्रामाणिक इच्छा आहे.’ असं मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं आहे. ते शुक्रवारी (19 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ADVERTISEMENT
पुण्यात पत्रकारांशी बोलताना भाजप-शिवसेना एकत्र यावं असं विक्रम गोखले म्हणाले होते. याचबाबत आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत पुन्हा एकदा व्यक्त केलं आहे.
आपला देश हा फार विचित्र अशा कड्यावर उभा आहे. त्यामुळे तिथून मागे यायचं असेल तर भाजप आणि शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे. असंही यावेळी विक्रम गोखले म्हणाले.
भाजप-शिवसेनेबाबत नेमकं काय म्हणाले विक्रम गोखले जाणून घ्या सविस्तरपणे.
‘भाजप आणि शिवसेना यांनी पुन्हा एकत्र यावं अशी माझी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे. त्याची गरज आहे. सुडो सेक्युलारिझम सांभाळणारे जे लोकं आहेत त्यांना मात्र याची भीती वाटतेय. दीड एक वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भाऊ-भाऊ, धाकटा भाऊ, मोठा भाऊ हे सगळं जे बोलणं झालं.. सामान्य मतदारांनी विश्वास ठेवला त्यांना निवडून दिलं. मतदान केलं कारण ते दोन्ही पक्ष एकाच कल्पनेने एकाच ध्येयाने प्रेरित होऊन काम करत होते.’
‘दोन्ही पक्षातील खूपच मोठमोठी माणसं.. ज्यांची तुलनाच होऊ शकत नाही इतरांशी त्याविषयावर अशी खूप मोठी माणसं दोन्ही पक्षात होऊन गेली. त्यांची भाषणं ऐकलेला माणूस आहे मी. त्यांची वृत्तपत्र वाचलेला माणूस आहे मी. त्यांचा जो अजेंडा आहे तो काय हे समजावून घेतल्यानंतर त्या पक्षाशी त्याच्या जवळ न जात लांब राहून पण एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून मी त्याला पाठिंबा देत आलेलो आहे.’
‘एकाच ध्येयाने प्रेरित होऊन जेव्हा दोन चांगले कार्य करणारे पक्ष एकत्र येऊ इच्छितात त्याच्यावर मी विश्वास ठेवला. माझ्यासारख्या करोडो लोकांनी विश्वास ठेवला. त्यांना निवडून दिलं मी. निवडणूक झाली. त्यानंतर जे झालं ते इतकं अनपेक्षित होतं, इतकं धक्कादायक होतं. जनतेला आपला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं आणि हा विश्वासघात नाही तर काय?’
‘दोन्ही पक्षांच्या चुका आहेत. दोन्हीही पक्ष माझे मित्र आहेत. पण दोघांच्या चुका झालेल्या आहेत. दोन्ही पक्षातील जे जबाबदार लोक आहेत त्यांच्याशी मी स्वत: बोललोय. म्हणून मी असं म्हणतो की, अजूनही वेळ गेलेली नाही. फार विचित्र अशा कड्यावर आपला देश उभा आहे. अशी माझी खात्री आहे. माझ्या अभ्यासामुळे. शंका नाहीए मला त्यावर.’
‘एक लक्षात ठेवा १९६२ सालचा भारत आज २०२१ मध्ये राहिलेला नाही. हे जेव्हा आज जगाला कळतं आणि आपल्या शत्रूंनाही कळतं तेव्हा ते थांबतात. ५० वेळा विचार करतात की, आम्ही हिंदुस्थानच्या विरोधात सैन्याची जमवाजमव करतोय. काय करता येईल. तर या असल्या शत्रूंना खतपाणी पुरवणारे जे आपल्या देशातील राजकीय पक्षांचे काही नेते हे त्यांच्याशी संबंधित असतात तेव्हा माझा संताप होतो आणि तो मी लपवत नाही. लपवणार नाही.’
‘म्हणूनच मी असं म्हणालो की, अजूनही वेळ गेलेली नाही. मी परत-परत हे म्हणत राहिल की, भाजप शिवसेनेने एकत्र यायला पाहिजे किंवा समविचारी जे पक्ष आहेत त्यांनी एकत्र व्हायला पाहिजे. ही माझी प्रमाणिक इच्छा आहे.’
Shivsena-BJP Alliance: अडीच वर्षांच्या वाटाघाटीवर चूक झाल्याचं फडणवीसांनी कबुल केलं – विक्रम गोखले
‘पण कसंय आपण सगळे सामान्य माणसं इच्छा व्यक्त करण्याच्या पलीकडे काहीही करु शकत नाही. आपण फक्त आशा व्यक्त करु शकतो. पण होतं वेगळंच. कारण राजकारणात काय होईल कोण कशा पगड्या फिरवेल. मतपेटीचं राजकारण करुन. यातलं आपल्यासारख्या सामान्य माणसाला ज्ञान नसतं. कळत असलं तरी तो करु काय शकत नाही. तो मतं व्यक्त करु शकतो. मी फक्त मतं नाही व्यक्त करत तर प्रयत्नही करतो.’ असं विक्रम गोखले यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT