मोबाईल चोराला अटक करण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात हिंगोलीतील औंढा-नागनाथ येथे जमावाने पोलीस ठाण्यावर दडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीत एक पोलीस उप-निरीक्षक जखमी झाला असून पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी हवेत गोळीबार केला आहे. या घटनेनंतर सदर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली असून स्वतः पोलीस अधिक्षक राकेश कलासागर घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार औंढा-नागनाथ पोलीस ठाण्यात ३ दिवसांपूर्वी तक्रारदाराने मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. हाच तक्रारदार आज पोलीस ठाण्यात येऊन मोबाईल चोराला अटक करा यावरुन वाद घालायला लागला. गेल्या काही दिवसांपासून या भागात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे हा वाद विकोपाला गेला. या वादावादीमुळे पोलीस आणि तक्रारदारामध्ये चांगलीच बाचाबाची झाली.
दरम्यान याची माहिती मिळताच पोलीस ठाण्याबाहेर लोकांचा जमाव आला आणि सुमारे ८० ते १०० जणांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीत एका पोलीस कर्मचाऱ्याला दुखापत झाली. पोलिसांनी हवेत गोळीबार करत जमावावर नियंत्रण मिळवलं असून दगडफेक करणाऱ्या लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. आतापर्यंत १३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतलं असून औंढा-नागनाथ परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT