मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आज (31 मार्च) पहाटेच्या सुमारास यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या गॉलब्लॅडरमधील (पित्ताशयातील) खडे काढण्यात आले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शरद पवार यांचा रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय पवार साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत’
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजच ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल
शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया सुरु असताना रुग्णालयात त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे या हजर होत्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर राजेश टोपे यांनी त्याबाबतची माहिती मीडियाला दिली. ‘शस्त्रक्रियानंतर शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्या पित्ताशयातून यशस्वीरित्या स्टोन काढण्यात आला आहे.’
यावेळी ब्रीच कँडीचे डॉक्टर अमित यांनी माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली की, ‘काही चाचण्या केल्यानंतर आम्हाला थोडीशी गुंतागुंत असल्याचं जाणवलं त्यामुळे आज शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांचं पित्ताशय काढून टाकायचं की नाही याबाबत आम्ही नंतर निर्णय घेऊ. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.’
दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर सुप्रिया सुळे यांनी एक फोटो ट्विट केला असून ब्रीच कॅँडीमधील सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत. त्यांच्या या फोटोमध्ये अजित पवार, राजेश टोपे, रोहित पवार आणि ब्रीच कँडीमधील डॉक्टर सोबत आहेत.
शरद पवार यांची प्रकृती बिघडली, ब्रीचकँडी रूग्णालयात बुधवारी होणार शस्त्रक्रिया
शरद पवार यांची प्रकृती रविवारी (28 मार्च) संध्याकाळी अचानक बिघडली होती. त्यामुळे त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पित्ताशयाचा त्रास झाल्याने त्यांच्या पोटात दुखू लागलं होतं. त्यानंतर त्यांच्या काही तपासण्या करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर आज (बुधवार) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
रुग्णालयात दाखल होण्याआधी पवार ‘त्या’ भेटीमुळे होते प्रचंड चर्चेत
दरम्यान, या शस्त्रक्रियेच्या दोनच दिवस आधी शरद पवार यांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होती. कारण त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी रविवारी दुपारी समोर आली होती. मात्र शरद पवार यांनी याबद्दल काहीही भाष्य केलं नव्हतं. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारचं काय होणार असाही प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात होता.
अमित शाह आणि शरद पवार यांची कथित भेट आणि काही अनुत्तरीत प्रश्न
मात्र त्याच दिवशी नवाब मलिक यांनीही अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर समोर आली ती त्यांची प्रकृती बिघडल्याची बातमी. त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. तपासण्या झाल्यानंतर त्यांच्यावर सर्जरी करण्याचा निर्णयही झाला होता.
ADVERTISEMENT