राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री केली जाणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्केअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत, सुपर मार्केट, वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याबाबत प्रस्ताव आला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
सध्या राज्यात वाईनची दरवर्षी ७० लाख लिटरच्या घरात विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळं हा आकडा आता १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्या आधी राज्य सरकारनं वाईनवर प्रति लिटरमागे १० रुपयांचा अबकारी कर जाहीर केला आहे. त्यामुळे वाईन च्या दरांमध्ये वाढ होणार आहे. याव्यतिरीक्त किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार नवीन वाईन पॉलिसी राबवण्याच्या तयारीत होतं. त्या दृष्टीकोनातून आज हे पाऊल टाकण्यात आलंय.
याबद्दल बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, “महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता १००० चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे.” उत्पादन शुल्कानं या आधीच आयात व्हिस्कीवरील शुल्क ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणले आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT