ईडीसह केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांवरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शनिवारी दापोली दौऱ्यावर असलेल्या किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा पुढील काही दिवसांत सत्ता पक्षातील तीन नेत्यांना अटक होईल, असा गौप्यस्फोट केला आहे. या विधानाला उत्तर देताना आपण केंद्रीय मंत्री अमित शाह आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे तक्रार केली असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी खासदारांच्या बारामती दौऱ्याबद्दलही माहिती दिली.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बारामतीत शरद पवार आणि अजित पवार यांनी केलेली विकासकामे आणि कृषि विज्ञान केंद्रासह अन्य संस्था याबद्दल सातत्यानं चर्चा होत असते. बारामती मॉडेलाच उल्लेख देशभरात होतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी सर्वपक्षीय खासदार दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. बारामती एमआयडीसी, विविध संस्था, टेक्सटाईल पार्क अशा विविध संस्थांना भेटी देवून त्यांनी माहिती घेतली. त्यांच्याही काही सूचना दिल्या. एकत्रितपणे काही सुधारणा करता येतील का याबाबत या दौऱ्यात चर्चा केली गेली”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“आपल्याकडे आता शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जात आहे. मुलांना सुखात जगता यावं म्हणून प्रत्येक आईवडिल त्यासाठी प्रयत्न करत असतात. आनंदी देशांच्या यादीत भारत मागे आहे, यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत.”
दोन दिवसांपूर्वी संसदेत ईडी आणि इतर कारवायांबद्दल सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता किरीट सोमय्यांनी पुढच्या आठवड्यात आणखी तीन जणांचा नंबर आहे, असं म्हटलेलं आहे. या मुद्द्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांना विनंती केली. निर्मला सीतारामन यांनीही मला ईडीबद्दल संसदेत उत्तर दिलं आहे. हे असं नसतं. नियम कायदे जेव्हा बनवतात… कुणीही आयुष्यभर सत्तेत नसतं. असाही कोणी निर्णय घेवू नये की त्याचा गैरवापर होईल. आपल्या विरोधकांना त्रास देण्याच्या हेतूने त्याचा वापर होवू नये असा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे”, असं त्यांनी सांगितलं.
“या देशातलं राजकारण बदलल्याचं अजितदादा म्हणतात. तशीच आज परिस्थिती आहे. सूडाचं राजकारण हे या देशात कधीच नव्हतं. मात्र, सध्या हे सातत्यानं पहायला मिळतंय. देशासमोर महत्वाचे प्रश्न आहेत. आज महागाई, रोजगार असे गंभीर विषय आहेत. कोरोनातून आपण आता बाहेर पडतोय. तेव्हा राजकारण्यांनी देश कसा पुढे जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. राजकारण होतच राहील.”
“निवडणुका आल्यानंतर लढूच ना, पण आता या देशाला कशाची गरज आहे तर अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची. लोकांच्या हाताला काम देण्याची आणि कोरोनामुळे व जगातील परिस्थितीमुळे देशात निर्माण झालेल्या संकटावर मात करण्याची. त्यावर लक्ष देणं आवश्यक आहे. राजकारण करायला निवडणुका आहेतच”, अशा शब्दात सुळे यांनी भूमिका मांडली.
महागाई, इंधन दरवाढ…
“सातत्याने केंद्र सरकार आणि राज्यातील विरोधी पक्ष आरोप-प्रत्यारोप करत आहे. हे महागाईपासून लपण्यासाठी केलं जातंय असं मला वाटतं. महागाई आणि परदेशातून परतलेल्या विद्यार्थ्यांचं पुढं काय होणार असे अनेक प्रश्न समोर असताना थातूरमातूर आरोप आणि पेन ड्राईव्ह हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला न शोभणारं आहे. देश कसा पुढे जाईल आणि जनतेला महागाईतून कसा दिलासा मिळेल हे बघणं महत्वाचं आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
ADVERTISEMENT