भाजप आमदार सुरेश धस आज मस्साजोग गावामध्ये पोहोचले. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला. मात्र, अद्यापही एक आरोपी फरार असून, पोलिसांची भूमिका साशंक असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. तसंच आरोपींना पोलिसांनी मदत केल्याचा आरोपही धनंजय देशमुख यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Raj Thackeray यांच्या भेटीसाठी उदय सामंत 'शिवतीर्थ'वर, महापालिकेच्या पार्श्वभूमीवर हालचाली?
फरार आरोपी हा पोलिसांचा मित्र आहे, त्यामुळे त्याला पोलीस काय करतील असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. तसंच पोलिसांनी आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात स्वत: काहीच तपास केला नसून, लोकांनीच त्यांच्याकडे पुरावे जमा केलेत, त्यामुळे ते काय कारवाई करत आहेत असा सवालही धनंजय देशमुख यांनी केला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, यांच्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या झाली. यांनी लवकर लक्ष दिले असते तर ही घटना घडली नसती असं धनंजय देशमुख म्हणालेत.
हे ही वाचा >>"ज्यादिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला...", मराठी साहित्य संमेलनात डॉ. तारा भवाळकरांचं सर्वात मोठं विधान
मस्साजोग गावचे ग्रामस्थ येत्या 25 तारखेपासून उपोषण किंवा आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहेत. तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त करत या गावकऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल मनोज जरांगे यांनीही मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतली आणि उपोषण न करण्याचं आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केलंय, मात्र गावकरी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत.
दरम्यान, सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानं या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. सुरेश धस-धनंजय मुंडेंच्या भेटीवरुन मनोज जरांगे यांच्यासह विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी गंभीर आरोप केले होते. तसंच, सुरेश धस यांनीही बावनकुळेंच्या वक्तव्यामुळे आपल्याबद्दल अविश्वास निर्माण झाल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता सुरेश धस यांच्या भूमिकेवर लोक विश्वास ठेवणार का? आणि सुरेश धस या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
