मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये तयार झालेला सत्तास्थापनेचा पेच अखेरीस संपुष्टात आलेला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरिश रावत यांनी अखेरिस चरणजितसिंग चन्नी यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड झाल्याचं जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
कॅप्टन अमरिंदर यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी बऱ्याच नेत्यांची नाव चर्चेत होती. अखेरीस चर्चेत असलेल्या बड्या नेत्यांना बाजूला सारत चन्नींच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. हरिश रावत यांनी ही घोषणा केल्यानंतर पंजाबचे राज्यपाल बन्वारीलाल पुरोहीत यांची वेळ मागितली असून संध्याकाळी साडेसहा वाजता ही भेट होणार असल्याचं कळतंय.
कॅप्टन अमरिंदर यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा होती. अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं शर्यतीत असताना रविवारी दुपारी सुखजिंदर रंधावा यांचं नाव चर्चेत आलं. प्रसारमाध्यमांमधून येत असलेल्या माहितीप्रमाणे रंधावा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ ही त्यांच्या गळ्यात पडणार हे निश्चीत झालं होतं. परंतू अखेरपर्यंत नेता निवडीचा हा सस्पेन्स पंजाबमध्ये कायम राहिला.
खुद्द रंधावा यांनीच प्रसारमाध्यमांना आपल्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नसून लवकरच नावाची घोषणा केली जाईल असं सांगितलं. यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरिश रावत यांनी सरप्राईज पॅकेज देत चन्नी यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याचं घोषित केलं. चन्नी यांना मुख्यमंत्री करणं हा हायकमांडचा निर्णय होता आणि मी याचं स्वागत करतो. मी जराही निराश नाही, ते माझ्या छोट्या भावासारखे आहेत. अशा शब्दांत सुखजिंदर रंधावा यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
पंजाब काँग्रेस गेल्या काही दिवसांमध्ये दोन गटांत विभागली केली होती. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांचा एक गट तर भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांचा एक गट. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर यांनी सिद्धू यांच्याविरुद्ध आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. सिद्धूंचे संबंध पाकिस्तानशी असून त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी आलं तर आपला विरोध असेल असंही अमरिंदर यांनी जाहीर केलं. परंतू हा सस्पेन्स संपुष्टात आल्यामुळे यापुढे पंजाबमध्ये काँग्रेसचं कामकाज कसं चालतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
“मी काँग्रेसचा अध्यक्ष असतो, तर कॅप्टन अमरिंदर सिंगांना ३० दिवसातच पक्षातून हाकललं असतं”
ADVERTISEMENT