माझ्या सांगण्यावरून सुशीलकुमार शिंदे यांनी पोलीस खात्यातील नोकरी सोडली. मी त्यांना पोटनिवडणुकीत आमदारकीचं तिकीट मिळवून देतो असं सांगितलं होतं. पण मी त्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करू शकलो नाही त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं असं शरद पवार यांनी पुण्यात सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत शरद पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे या दोघांची मैत्री राजकारणाच्याही पुढची आहे. याची प्रचिती शरद पवार यांनी जो किस्सा पुण्यात सांगितला त्यामुळे आली. मी त्यावेळी आलेल्या सरकारमध्ये गृहमंत्री झालो. सुशीलकुमार शिंदे कायद्याचे पदवीधर असल्याने मी त्यांना सरकारी वकील बनवलं. आपली जी काही प्रकरणं असतील तर ती सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे द्यायची असं मी ठरवलं. पुढे झालेल्या निवडणुकीत मी सुशीलकुमार शिंदे यांना तिकीट मिळवून देण्यात य़शस्वी झालो असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.
पुण्यात नवरात्र उत्सवात दरवर्षी दिला जाणार महर्षी पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदा यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर राज्यमंत्री विश्वजीत कदम हे प्रमुख पाहुणे होते.
शरद पवार पुण्यात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांबाबत काय म्हणाले?
शरद पवार यांनी या पुरस्कार सोहळ्या भाषण करताना मिश्कील टिपण्णीही केली. पुण्यात जेवढे पुरस्कार दिले जातात तेवढे देशातल्या कुठल्याच शहरात दिले जात नाहीत असं शरद पवार म्हणाले तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुरस्कार देणारे, पुरस्कार ठरवणारे आणि पुरस्कार स्वीकारणारे ठराविक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्यासोबत (राष्ट्रवादीसोबत) आपली राजकीय कारकीर्द पुढे सुरू ठेवली नाही, याचे आजही वाईट वाटते. पण पवारांनी त्याविषयी कधी शब्दाने विचारले नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, असे सुशीलकुमार शिंदे यांनी या वेळी मनोगतात सांगितले. पवार यांनी सुशीलकुमारांची खंत ही तातडीने दूर केली. तुम्ही काँग्रेससोबत आहात. गांधी-नेहरूंच्या विचारासोबत तुम्ही आहात. तो आमचाही विचार आहे. त्यामुळे तुम्ही आमच्यापासून दूर गेलेला नाही, अशा शब्दांत पवार यांनी त्यांना अशी सल ठेवू नका, असा सल्ला दिला
ADVERTISEMENT