मुंबई: राज्यसभा निवडणुकीतील चुरस वाढणार हे आता निश्चित झालं आहे. कारण उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या काही तास आधी भाजपने आपला तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपने आता कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
भाजपने सुरुवातीला दोनच उमेदवार जाहीर केले होते. खरं म्हणजे दोनच उमेदवार निवडून येतील एवढंच संख्याबळ भाजपकडे आहे. अशावेळी आता तिसरा उमेदवार भाजप कसा निवडून आणणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसंच शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून यावा यासाठी त्यांना महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे मतदान करावं लागणार आहे.
भाजप या निवडणुकीत तिसरा उमेदवार देऊन चुरस वाढविण्याची शक्यता आहे अशी जोरदार चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती आणि झालं देखील तसंच. भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.
पहिल्या यादीत भाजपने केवळ मंत्री पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांच्याच नावाची घोषणा केली होती. मात्र, काही वेळापूर्वीच त्यांनी महाराष्ट्रातून तिसऱ्या उमेदवाराची घोषणा करुन याबाबतचा सस्पेन्स संपवला आहे.
भाजपने आपला तिसरा उमेदवार जाहीर केल्यामुळेआकड्यांचं गणित कसं जुळवलं जातंय याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. जाणून घेऊयात सध्याच्या विधानसभेत असलेलं पक्षीय बलाबल नेमकं काय आहे.
महाविकास आघाडी – १६९ आमदार (शिवसेना ५५ + राष्ट्रवादी ५३ + काँग्रेस ४४ + इतर पक्ष ८ + अपक्ष ८)
भाजप – ११३ आमदार (भाजप १०६ + रासप-जनसुराज्य प्रत्येकी १-१ + अपक्ष ५)
* शिवसेनेच्या विधानसभेत ५६ जागा आहेत, परंतू आमदार लटके यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे.
राज्यसभेत खासदार निवडून येण्यासाठी एक निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील एकूण विधानसभा सदस्यांची संख्या भागिले (÷) राज्यसभेच्या रिक्त जागा + १ या सूत्रानुसार खासदार निवडून येतात. ज्यामुळे प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी ४२ मतांची गरज लागणार आहे.
संभाजीराजेंमुळे राज्यसभेची निवडणूक प्रचंड चर्चेत, समजून घ्या या निवडणुका होतात तरी कशा!
सहावी जागा लढवण्यासाठी लागणारी आकडेमोड महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे सहाव्या जागेवर शिवसेना आपली जागा निवडून आणणार आहे. परंतू तिन्ही पक्षांचा एक-एक उमेदवार निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीकडे 26 मतं उरतात त्यामुळे उरलेल्या मतांसाठी त्यांना अपक्षांची मनधरणी करावी लागणार आहे. अपक्षांनी साथ दिल्यास सहावी जागा महाविकास आघाडी सहज निवडून आणू शकते.
दुसरीकडे भाजपही या सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपला राज्यसभेत आपलं बहुमत अबाधित राखायचं आहे. त्यामुळे दोन जागा निवडून आल्यानंतर भाजपकडे 22 मतं शिल्लक राहतात आणि त्यांना इतर पक्ष आणि अपक्ष मिळून 7 आमदारांचा पाठिंबा आहे. ज्यामुळे भाजपकडे सहाव्या जागेसाठी 29 मतं तयार असून त्यांना उर्वरित 13 मतांसाठी जुळवाजुळव करावी लागणार आहे.
ADVERTISEMENT