मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे यांनी ‘ईल’ माशाची नवीन प्रजाती शोधली आहे. तेजस ठाकरे यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर याबाबतची माहिती दिली आहे. तेजस यांच्या मते हा मासा ‘रक्थमिच्तिस’ या प्रजातीचा आहे. ज्याला गोड्या पाण्यातील ‘ईल’ असेही म्हटले जाते.
ADVERTISEMENT
माशाची ही नवीन प्रजाती `hypogean freshwater eel’ आहे, ज्याच्या शोधाचे श्रेय तेजस ठाकरे, प्रवीणराज, अनिल महापात्रा आणि अनम पवन कुमार यांना देण्यात आले आहे. दरम्यान, या नव्या प्रजातीचं नाव ‘रक्थमिच्तिस मुंबा’असे ठेवण्यात आले आहे. मुंबईवरून या ईलचे नामकरण करण्यात आले आहे.
तेजस ठाकरे आणि त्यांच्या मित्रांना 2019 साली आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईतील जोगेश्वरीमधील एका शाळेतील छोट्या विहिरीत माशाची ही दुर्मिळ प्रजाती आढळून आली होती. यावर तेजस ठाकरे आणि त्यांच्या मित्रांनी बरंच संशोधन केलं. ज्यानंतर ‘ॲक्वा इंटरनॅशनल जर्नल ऑफ इचिथोलॉजी’या संशोधनपत्रिकेत त्यांचा या माशाच्या नव्या प्रजातीविषयी छापून आलं.
ईल या माशाची प्रजाती ही अंध आहे. भूगर्भातील गोड्या पाण्यामध्ये पूर्णपणे अंध अशा स्वरुपाची ही माशाची प्रजाती आहे. ईल माशाची ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ समजली जाते. कारण भूगर्भातील गोड्या पाण्यात हा मासा आढळून येतो.
रक्थमिच्तिस प्रजातीमधील हा मासा दिसायला देखील फारच वेगळ्या स्वरुपाचा आहे. या माशाचा आकार साधारण 32 सेटींमीटर एवढा आहे. ज्याचा रंग हा गुलाबी आहे. हा मासा आपल्या शरीरातील संवेदनांच्या माध्यमातून आपले भक्ष्य शोधतो.
तेजस ठाकरे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘काही वर्षांपूर्वी आम्हाला ही नवीन प्रजाती सापडली होती, आम्ही कोरोना काळात त्यावर बरंच काम केलं आणि आता आम्ही त्याविषयीची माहिती जगासमोर आणत आहोत.’
ही पहिली गोड्या पाण्यातील अंध माशांची प्रजाती आहे, जी भारतात आढळली आहे. हे उल्लेखनीय आहे की, तेजस ठाकरे या क्षेत्रात काम करत आहेत आणि ते एक प्रसिद्ध निसर्गवादी आहेत. तेजस ठाकरे यांचे वडील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील वन्यजीव छायाचित्रकार आहेत.
Tejas Thackeray हे ठाकरे कुटुंबाचे Vivian Richards, वाचा कोणत्या नेत्यानं केलं आहे कौतुक?
तेजस ठाकरे नेमकं काय करतात?
भाऊ आदित्य ठाकरे आणि वडील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय नाहीत. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी तेजस ठाकरेंनी शिवसेनेचा प्रचार केला होता. वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वन्य जीवांचा अभ्यास करत असताना खेकड्यांच्या अनेक प्रजातीही तेजस यांनी शोधल्या आहेत. यातल्या एका प्रजातीला ठाकरे कुटुंबीयांचं नाव देण्यात आलं आहे.
मागील वर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचाही शोध त्यांनी लावला होता. कर्नाटकमध्ये असलेल्या सकलेशपूरच्या जंगाल उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातीच्या पाली आढळून आल्या आहेत. तेजस ठाकरे यांच्या इंस्टापेजवरही या पालींचे आणि खेकड्यांचे फोटो आहेत.
ADVERTISEMENT