नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भोंदूबाबाला अटक, ठाण्यातली धक्कादायक घटना

मुंबई तक

• 05:31 AM • 24 Mar 2022

जादूटोणा आणि काळी जादू करून भूतप्रेत उतरवण्याच्या बहाण्याने अनेक लोकांना गंडा घालणाऱ्या एका भोंदूबाबाला ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी या भोंदूबाबाच्या दोन साथीदारांना देखील अटक केली आहे. या भोंदू बाबाकडून पोलिसांनी ६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. तसेच या भोंदूबाबाचे अकाऊंट देखील पोलिसांनी जप्त […]

Mumbaitak
follow google news

जादूटोणा आणि काळी जादू करून भूतप्रेत उतरवण्याच्या बहाण्याने अनेक लोकांना गंडा घालणाऱ्या एका भोंदूबाबाला ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी या भोंदूबाबाच्या दोन साथीदारांना देखील अटक केली आहे. या भोंदू बाबाकडून पोलिसांनी ६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. तसेच या भोंदूबाबाचे अकाऊंट देखील पोलिसांनी जप्त केलं आहे.

हे वाचलं का?

ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात नरबळी देण्यासाठी एका अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करून त्या मुलाचा नरबळी देण्यासाठी वापर करणार असल्याची तक्रार भोंदूबाबाच्या भावाने नोंदवली. हा अल्पवयीन मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून भोंदूबाबाच्या भावाचाच मुलगा म्हणजे पुतण्या आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा नोंद करत तपासाला सुरुवात केली. या दरम्यान पोलिसांनी भोंदूबाबा कुलदीप निकम याला अटक केली. त्याची चौकशी केली असता या प्रकरणात पोलीस आणखी दोन आरोपींपर्यंत पोहचले. त्या दोन आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.

किशोर नवले आणि स्नेहा शिंदे अशी या भोंदूबाबाच्या साथीदारांची नावे आहेत. यावेळी भोंदू बाबा कुलदीप निकम याच्या कल्याण येथील ऑफिसची झडती घेतली असता पोलिसांना त्या ठिकाणी तीन महागडे लॅपटॉप, एक महागडा मोबाईल टॅब, मोबाईल फोन्स, ड्रोन कॅमेरे, नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे, महागडे नाईट व्हिजन गोप्रो कॅमेरे, एक Ghost Detector, पैसे मोजण्याचे मशिन, प्राण्यांचे दात, सापाची कातडी, होम हवनचे साहीत्य, सफेद कवड्या, रुद्राक्षाच्या माळा, हार्डडिस्क, कावळ्याचे पंख, काळ्या बाहुल्या, पिऱ्यामिड, त्रिशुळ, चिमटा व इतर तंत्रविद्येची पुस्तकं आढळून आले तसेच आरोपी किशोर नवले यांच्या बदलापूर येथील घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी पोलिसांना दोन वाघाचे कातडे, हॅलोजन लाईट आणि इतर वस्तू असा मुद्देमाल आढळून आला.

या सर्व मुद्देमालाची किंमत अंदाजे ६ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. या संपूर्ण मुद्देमालासह पोलिसांनी एक महागडी चारचाकी जप्त केली आहे. तसेच नागरिकांची फसवणूक करून साठवलेल्या पैशांचे अकाऊन्ट देखील पोलिसांनी जप्त केले आहे. या अकाऊंट मध्ये देखील ६ ते ७ लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठाण्यातील वर्तक नगर परिसरात राहणारा कुलदीप निकम या भोंदू बाबाने युट्युबवर आपले चायनल बनवून आपण जादूटोणा करून भूतप्रेत उतरवत असल्याची बतावणी करत लोकांच्या घरात होमहवन आणि तंत्रमंत्र करत अनेकांच्या घरातील भूतप्रेत उतरवल्याचे अनेक व्हिडिओ अपलोड केले आहेत. हे व्हिडिओ पाहून अनेकजण या भोंदूबाबाला संपर्क करत असत. संपर्क केल्यानंतर हा भोंदू बाबा त्यांच्या घरी जाऊन संपूर्ण घोस्ट डिटेक्टर मशीनच्या मदतीने लोकांना भुरळ पाडून घरात भूतप्रेत असल्याचे सांगत त्यांच्या घरात नाईट व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे लावून काळी जादू, जादूटोणा आणि होमहवन करत असे. या भूतप्रेत पळवण्याच्या कामासाठी तो लोकांकडून दीड ते दोन लाख रुपये वसुली होता. हा संपूर्ण पोलिसांनी उधळून लावत आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणात ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांनी ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणात या आरोपींनी किती नागरिकांची फसवणूक केली आहे. तसेच आणखीन काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या भोंदूबाबा आणखीन काही महागड्या चारचाकी गाड्या असल्याची माहिती समोर आली असून त्या दिशेने तपास सुरु असल्याची माहिती परिमंडळ ५ चे पोलीस उपयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

    follow whatsapp