सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार का? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली तीन कारणं

मुंबई तक

• 08:02 AM • 25 Apr 2022

आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं. मात्र ज्या काही घटना गेले चार-पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय त्या पाहिल्यानंतर या सरकारने संवादासाठी जागा ठेवली आहे असं आम्हाला वाटत नाही. कुणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं असेल तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा अशी आमची मानसिकता झाल्याने आम्ही बैठकीवर बहिष्कार घातला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया […]

Mumbaitak
follow google news

आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं. मात्र ज्या काही घटना गेले चार-पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय त्या पाहिल्यानंतर या सरकारने संवादासाठी जागा ठेवली आहे असं आम्हाला वाटत नाही. कुणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं असेल तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा अशी आमची मानसिकता झाल्याने आम्ही बैठकीवर बहिष्कार घातला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

रामदेव बाबाच्या शिबिरात भेट अन्…; नवनीत राणा आणि रवी राणांच्या लव्हस्टोरीचा किस्सा

विरोधी पक्षाला जिवानिशी संपवायचं ही जर एक सरकारची प्रवृत्ती असेल आणि सरकारी पक्षातले लोक विऱोधकांवर पोलिसांच्या समोर हल्ले करणार असतील आणि त्यानंतरही FIR नोंदवायला संघर्ष करावा लागत असेल तर अशा परिस्थितीत अशा बैठकीला जाऊन फायदा काय? अशी परिस्थिती आजवर महाराष्ट्रात आम्ही कधीही पाहिली नाही. सरकारतर्फे पोलीस संरक्षणाच्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

रवी राणांकडून उद्धव ठाकरेंचा निषेध नोंदवत पोलीस ठाण्यात १०१ वेळा हनुमान चालीसा पठण

आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला गेला. अशा प्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाविरोधात बोलणं बंद करू असं त्यांना वाटत असेल तर गैरसमज त्यांनी तो काढून टाकावा. ज्या प्रकारे किरीट सोमय्यांवर हल्ला झाला, ज्या प्रकारे मोहित कंबोज यांचं मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. भाजपच्या लोकांना टार्गेट करून त्यांच्यावर केसेस टाकल्या जातात आहेत. सत्ताधारी पक्ष इतक्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं. पोलिसांचा दुरूपयोग जाणीवपूर्वक केला जातो आहे. हा दुरूपयोगच आहे असं आम्हाला वाटतं. गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन उपयोग काय? त्यांना अधिकार आहेत का? सगळं जे काही चाललं आहे ते उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून चाललं आहे. ही बैठक म्हणजे निव्वळ टाइमपास आहे का?

ज्या प्रकारे आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा यांच्यासोबत व्यवहार झाला ते पूर्ण चुकीचं होतं. त्यांनी काही मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हल्ला करू, आंदोलन करू असं काहीही म्हटलेलं नव्हतं. फक्त हनुमान चालीसा म्हणणार हेच सांगितलं होतं. हनुमान चालीसा महाराष्ट्रात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानात म्हणायची का? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

तुम्ही अशा प्रकारे वागाल आणि आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न कराल तर लक्षात ठेवा आम्ही गप्प बसणार नाही. केरळमध्ये आमच्या अनेक कार्यकर्त्यांना मारून टाकलं गेलं तरीही आम्ही गप्प बसलेलो नाही. तर मग हा तर महाराष्ट्र आहे. जर महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणं हा राजद्रोह असेल तर आम्ही रोज हनुमान चालीसा म्हणणार असाही इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. एवढंच नाही तर त्यांनी हनुमान चालीसा म्हणून दाखवत हिंमत असेल तर दाखल करा राजद्रोहाचा गुन्हा असं आव्हानही त्यांनी दिलं आहे.

    follow whatsapp