कल्याण: पाणी कनेक्शन का कापले? अशी विचारणा करणाऱ्या रहिवाश्याला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT
मनोज प्रजापती (वय 33) यांनी आपल्या नळाचे कनेक्शन का कापले असा सवाल करताच बिल्डर रामप्रताप सिंग आणि विकास रामप्रताप सिंग या पिता-पुत्राने त्यांना रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पिसवली येथील अमरदीप कॉलनीतील गोकुळधाम सोसायटीत सोमवारी घडली.
दरम्यान, मनोज प्रजापती यांनी केलेल्या तक्रारीवरून आता मानपाडा पोलीस ठाण्यात सिंग पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मनोज हे गोकुळधाम सोसायटीत गेल्या पाच वर्षापासून पत्नी आणि मुलासह राहतात. सोमवारी ते संध्याकाळी पाच वाजता कामावरून घरी आले. त्यावेळी घरी पाणी नसल्याचे समजले असता ते सोसायटीच्या कार्यालयात गेले.
त्याठिकाणी असलेले बिल्डर रामप्रताप सिंग यांना माझ्या घरात पाणी नाही, तुम्ही माझे पाणी कनेक्शन का तोडले? अशी मनोज यांनी विचारणा केली. यावर रामप्रताप यांनी आधी मेंटेनन्स भरा तेव्हा पाणी चालू करतो असे सांगितले.
‘मी 5 हजार रूपये सोसायटीसाठी दिलेले आहेत तुम्ही आधी माझे पाणी कनेक्शन चालू करा.’ असे मनोज यांनी त्यांना सांगितलं. पण याचवेळी रामप्रताप यांनी त्याला शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.
मनोज यांनी प्रतिकार करताच रामप्रताप यांनी त्यांचा मुलगा विकासला फोन करून कार्यालयात बोलावून घेतले. त्याठिकाणी आलेल्या विकासने थेट लोखंडी रॉडने मनोज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. जिथे त्यांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मनोज यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात सिंग पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत मलंगगड भागात तरूणांना मारहाण, दोन तरूणींचा विनयभंग
दरम्यान, पोलिसात गुन्हा दाखल झालेला असलं तरीही अद्याप हा बिल्डर पिता-पुत्राला अटक करण्यात आलेली नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे मुजोर बिल्डर आणि त्याच्या मुलावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनोज प्रजापती आणि त्यांच्या कुटुबीयांनी केली आहे. तसेच याप्रकरणी आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT