मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. तसंच तो त्यांचा मतदारसंघही आहे. त्याच ठाण्यात वर्षातला पहिला खड्डेबळी गेला आहे. ठाण्यात घोडबंदर रोड भागात पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे बाईकस्वाराचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
काय घडली घटना?
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील काजूपाडा परिसरात एका दुचाकी स्वाराचा खड्ड्यामुळे बळी गेल्याची घटना घडली आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रोडवर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. खड्ड्यामुळे तोल जाऊन हा व्यक्ती खाली पडला आणि मागून येणाऱ्या बसच्या चाकाखाली गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.
या तरूणाचा अपघात ठाणे ग्रामीण परिसरात घडला असून या प्रकरणी ठाण्यातील काशिमिरा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आला आहे. अपघातात मृत्यू झालेला व्यक्ती हा ठाण्यातील मुंब्र्यामधील अमृतनगर परिसरातील राहणार आहे. मोहनीश हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब हे उत्तर प्रदेश येथे स्थायिक आहे.
नोकरी करिता मुंबई येथे आला होता. मोहनीश हा इलेक्ट्रीशिअनचे काम करत होता. मोहनीशच्या मृत्यू पश्चात त्याचा मृतदेह अंतिमसंस्कार करण्यासाठी मुळगावी उत्तर प्रदेश येथे नेण्यात आला आहे, ही माहिती मोहनीश खानचे नातेवाईक झाफर खान यांनी दिली आहे. झाफर खान यांनी काशिमिरा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून ते भेंडी बाजार, सँडहर्स्ट रोड मुंबई येथील रहिवासी आहेत.
दरवर्षी रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याच्या घटना घडतात. यावर्षीही अपघातांचं सत्र सुरू झालं आहे. ठाण्यात दुचाकीस्वाराचा झालेला हा मृ्यू हा या वर्षातला पहिला खड्डे बळी आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. मागच्या वर्षी नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी खड्डे आणि रस्त्यांची कामं नीट न करणाऱ्या अधिकाऱ्यांना झापलं होतं. त्यासंदर्भातला व्हीडिओही व्हायरल झाला होता. मात्र यावर्षीही परिस्थिती जैसे थे आहे हेच हा अपघात सांगतो आहे. एवढंच नाही वर्षभरात खड्डे पडल्यामुळे पुलाच्या निकृष्ट दर्जाकडेही लक्ष वेधलं जातं आहे.
ADVERTISEMENT