राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या अटकेविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. मला करण्यात आलेली अटक बेकायदा आहे असा दावा केतकीने याचिकेत केला आहे. तसंच केतकी चितळे प्रकरणात केंद्रीय महिला आयोगासमोर सुनावणीसमोर पार पडली. त्यावेळी केतकी चितळेला कोणत्या आधारे अटक करण्यात आली आहे? असा प्रश्न महिला आयोगाने विचारला आहे.
ADVERTISEMENT
केतकी चितळेला कोणत्या आधारे अटक केली? तिला अटक करताना नोटीस दिली होती का? असे प्रश्न आयोगाने उपस्थित केले आहेत. अशा स्वरूपाच्या केसेसच्या डेटा पोलिसांकडून आयोगाने मागितला आहे. केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली.
महिला आयोगाने काय प्रश्न उपस्थित केले आहेत?
FIR मध्ये बदनामीची तरतूद का करण्यात आली?
या प्रकरणातील तक्रारदार कोण होते?
केतकी चितळेने पोस्ट केलेली कविता अनेकांनी शेअर करूनही केतकीवरच कारवाई का?
केतकी चितळेला अटक करण्यापूर्वी सीआरपीसीच्या कलम ४१ ए मध्ये नमूद केलेल्या कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं गेलं की नाही?
केतकी चितळे प्रकरणी केंद्रीय महिला आयोगासमोर झालेल्या सुनावणीत राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे उपस्थित होते. केतकी चितळे प्रकरणात महिला आयोगाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची लेखी उत्तरं १५ दिवसात पोलिसांनी द्यावी असंही आयोगाने म्हटलं आहे.
शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी केतकी चितळेवर २० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यातल्या अॅट्रोसिटी प्रकरणात तिला जामीन मिळाला आहे. मात्र शरद पवारांविषयी जी पोस्ट केली त्याची सुनावणी २१ जूनला होणार आहे त्यामुळे जामीन मिळूनही तिचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.
काय आहे प्रकरण?
केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. त्याचबरोबर केतकी चितळे ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोस्टची पार्श्वभूमी काय?
मूळ पोस्ट अॅड. नितीन भावे या व्यक्तीची असून केतकीने शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी साताऱ्यात केलेल्या भाषणात कवी जवाहर राठोड यांची एक कविता वाचून दाखवली होती. या कवितेतून कवीने देवी-देवतांवर टीकात्मक भाष्य केलेलं आहे. याच कवितेवरून सोशल मीडियावरून पवारांवर टीका केली जात होती. पवारांच्या भाषणाचा निवडक भाग शेअर करून ही टीका केली गेली. त्याच प्रकरणावरून केतकीने ही पोस्ट शेअर केली आहे.
ADVERTISEMENT