शरद पवार हेच महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. एवढंच नाही तर आम्ही कोणत्याही मोठ्या नेत्याविरोधात भाष्य किंवा वक्तव्य करत नाही पण आमच्याबाबत विधान करण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीने आपल्या पक्षाकडेही पाहण्याची गरज आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा केली होती. 2024 मध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर आपली सत्ता महाराष्ट्रात आणेल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केलं, संजय राऊत म्हणाले होते की प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नाना पटोले जे म्हणाले त्यात चुकीचं काही नाही. त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी सरकारला काही धोका आहे असं मुळीच नाही. महाविकास आघाडी सरकार हे आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे.
एवढंच नाही तर शरद पवार यांनीही नाना पटोलेंच्या स्वबळाच्या मुद्द्यावर भाष्य करत मी लहान माणसांबद्दल बोलत नाही असं म्हटलं होतं. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात आम्ही स्वळावर तुमच्याकडे जेवायला येऊ असा टोला लगावला होता. त्यानंतर सोमवारी नाना पटोले यांचं आणखी एक वक्तव्य समोर आलं. सोमवारी त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्या व्हीडिओत नाना पटोले यांनी अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे माझ्यावर पाळत ठेवून आहेत. मात्र त्यानंतर जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला मी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्याबाबत बोललो होतो अशी सारवासारव नाना पटोले यांनी केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांचं वक्तव्य समोर आलं आहे. शरद पवार हेच महाविकास आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत अस वक्तव्य आता नाना पटोले यांनी केलं आहे.
रिमोट कंट्रोल हा शब्द बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत वापरला जाई. 95-96 च्या दरम्यान जेव्हा महाराष्ट्रावर जेव्हा शिवसेना आणि भाजपच्या युतीचं सरकार होतं तेव्हा सगळा कारभार बाळासाहेब ठाकरे यांच्या सल्ल्यानेच चालत होता. त्यावेळी त्याना रिमोट कंट्रोल म्हटलं गेलं होतं. त्यांच्यावर जेव्हा या शब्दावरून टीका झाली तेव्हा त्यांनी भर भाषणात सांगितलं होतं काँग्रेसचं हायकमांड असतं तसं माझं रिमोट कंट्रोल आहे असं बाळासाहेब ठाकरे यांनी भर सभेत टिकाकारांना उत्तर दिलं होतं. आता एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंना दिली गेलेली उपाधीच आज काँग्रसने शरद पवारांना दिली आहे.
ADVERTISEMENT