पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत पुण्यातील भाजपच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शहरभर फ्लेक्स लावले आहेत. पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शहरात त्यांचा फोटो असलेले फ्लेक्स लावले आहेत तर पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर आणि हेमंत रासने यांनी वेगळे प्लेक्स लावले आहेत. या सर्व फ्लेक्सवरती माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचा फोटो गायब आहे. आणि पुण्यात हाच चर्चेचा विषय ठरला आहे.
ADVERTISEMENT
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात अनेक ठिकाणी फ्लेक्स पाहायला मिळत आहेत. शहर भाजपच्यावतीने शहरातील मोक्याच्या विविध ठिकाणी मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. शहरातील सर्व प्रमुख नेत्यांचे फोटो फ्लेक्सवरती पाहायला मिळत आहेत. परंतु माजी महापौर असलेल्या मोहोळ यांचा फोटो फ्लेक्सवरती दिसत नाहीये. त्यामुळे पुणे मनसे प्रमाणे भाजपमध्येही अंतर्गत गटबाजी सुरु झालीये का? अशी चर्चा रंगू लागली आहे.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या फ्लेक्सवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यासह अनेक नेत्यांची फ्लेक्सवर फोटो आणि नावं आहेत. मात्र माजी महापौर आणि पुण्यातील भाजपचे धडाडीचे नेते असलेल्या मुरलीधर मोहोळांचा फोटो काय साधं नाव देखील पाहायला मिळत नाहीये.
ADVERTISEMENT