प्रविण ठाकरे, नाशिक
ADVERTISEMENT
‘तीन काळे कायदे रद्द होत आहेत, हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याचा दिवस आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवले, भिकेत मिळवलेले नाही. जवळपास 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिले. जालियानवाला बागेत ज्या पद्धतीने इंग्रजांनी लोकांना चिरडले तसेच लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडून मारले. म्हणूनच मला आजची सकाळ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य वाटते.’ असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका तर केलीच मात्र अभिनेत्री कंगना आणि अभिनेते विक्रम गोखले यांना देखील टोला लगावला. संजय राऊत हे आज (20 नोव्हेंबर) काही कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
पाहा संजय राऊत नेमकं काय-काय म्हणाले
‘मोदींनी ‘त्या’ भीतीने तीन कृषी कायदे रद्द केले’
‘पंतप्रधानांनी अमानुषपणे बहुमताचा गैरवापर करून लादलेले हे तिन्ही कृषी कायदे होते. म्हणून त्यांनी देशाची माफी मागितली. पंतप्रधानांनी कृषी कायदे लादल्यामुळे देशातील 700 शेतकऱ्यांना मरणाला सामोरे जावे लागले. कायदे रद्द झाले हे फार मोठ्या सद्भावनेने रद्द झालेले नाहीत. शेतकरी मागे हटत नसल्याने असंतोष वाढलेला दिसला.’
‘देशातील 13 राज्यांमधील पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला. उद्याच्या विधानसभेत उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये सत्ता गमवावी लागेल, या भीतीतून हे कायदे रद्द झाले आहेत. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
‘कंगना रणौत किंवा विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही’
‘2014 नंतर खरं स्वातंत्र्य मिळाले असे काही जणांना वाटते, तशीच स्वातंत्र्याची पहाट ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने उगवल्याचे मलाही वाटते. दीड वर्षांपासून शेतकरी ज्या तणावाखाली, दबावाखाली आणि दहशतीखाली होता ते दहशतीचे जोखड निघाले आहे, असे मला वाटते.’
‘स्वातंत्र्य म्हणजे काय असते? कंगना रणौत किंवा विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही, तुमच्या मनावरची जोखड जेव्हा निघून जाते, फेकले जाते ते स्वातंत्र्य असते, मग राज्यकर्ते कोणीही असो.’ असंही राऊत यावेळी म्हणाले.
‘शेतकऱ्यांना गाडीने चिरडलं तरीही ते मागे हटले नाही’
‘शेतकरी हा आपल्या शेतीचा मालक नसून गुलाम बनवण्याचा हा कायदा होता. नव्या प्रकारची कॉर्पोरेट जमीनदारी ही देशात लादली जाणार होती. ईस्ट इंडिया कंपनीने देश ज्या पद्धतीने पारतंत्र्यात टाकला, त्याच पद्धतीने भांडवलदारांना ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी एक कायदा बनवला होता.’
‘देशातील शेतकऱ्यांनी एकजुटीने दीड वर्ष रस्त्यावर ऊन, वारा, पाऊस, बलिदान देत, मंत्र्यांनी गाडीने चिरडत आणि पोलिसांनी गोळीबार केल्यानंतरही ते हटले नाहीत.’ असं म्हणत राऊतांनी मोदी सरकारवर प्रचंड टीका केली.
‘हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवले, भिकेत मिळवलेले नाही’
‘पंजाब आणि हरियाणातील शेतकरी हटले नाहीत. हे दोन राज्यातील शेतकरी हे देशातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यामुळेच सरकारला झुकावे लागले. तीन काळे कायदे रद्द होत आहेत, हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याचा दिवस आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवले, भिकेत मिळवलेले नाही.’
‘जवळपास 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिले. जालियानवाला बागेत ज्या पद्धतीने इंग्रजांनी लोकांना चिरडले तसेच लखीमपूर खेरा येथे शेतकऱ्यांना चिरडून मारले. म्हणूनच मला आजची सकाळ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य वाटते.’ असं म्हणत राऊतांची मुलखमैदान तोफ ही यावेळी भाजपविरोधात धडाडली.
‘2014 पासूनच देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं, मी माझ्या मतावर आजही ठाम’, विक्रम गोखले पुन्हा तेच म्हणाले
‘चंद्रकांत पाटलांना शोकसंदेश पाठवतो’
कृषी कायदा मागे घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठ नुकसान होणार आहे. तसेच तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा नाईलाजाने घ्यावा लागत असल्याचे याआधी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते.
तसेच कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दु:खद असल्याचे म्हटले होते. याबाबत जेव्हा राऊतांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा ते असं म्हणाले की, ‘मी आता कृषी कायदे रद्द केल्याबाबत शोकसंदेश पाठवतो आहे. माणूस जेव्हा दुःखात असतो, तेव्हा त्यांच्यासाठी एखादी शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू. या देशामध्ये शेतकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असेल, पण हा जर कोणाला शोक वाटत असेल तर मानसिकता तपासावी लागेल.’ असाही टोला राऊतांनी लगावला.
ADVERTISEMENT