ADVERTISEMENT
राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे उद्यापासून (3 मार्च) सुरु होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सहयाद्री अतिथीगृह येथे चहापान पार पडले.
अधिवेशनाच्या आधी चहापानाचा कार्यक्रम ही एक राजकीय परंपरा आहे. पण यावेळचा चहापानाचा कार्यक्रम देखील मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीतच पार पडला. मुख्यमंत्री प्रकृतीच्या कारणामुळे यावेळेसही चहापानाला हजर राहिले नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चहापानाला नसले तरी त्यांचे पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या कार्यक्रमात पुढाकार घेतला असल्याचं दिसून आलं.
या कार्यक्रमात आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी गुफ्तगू करताना दिसले. दरम्यान, चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षाने बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संपूर्ण वेळ उपस्थित राहण्याचा आदेश शिवसेनेकडून आपल्या सर्व आमदारांना बजावण्यात आला आहे. त्याप्रमाणेच NCP ने देखील अशाच प्रकारे आमदारांना आदेश दिला आहे.
चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीच्या सुरुवातीला माजी मंत्री, ज्येष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांच्या निधनाबद्धल त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शोकप्रस्तावाचे वाचन केले.
ADVERTISEMENT