अकोल्यातील कुरणखेड भागातील जवळा गावातील नागरिकांची सध्या झोप उडाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून या गावातील शेतशिवाराता वाघाचं वास्तव्य असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची भीती वाटत आहे. काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी वनविभागाला याबद्दल माहिती दिली होती.
ADVERTISEMENT
परंतू त्यावेळी वनविभागाने याकडे लक्ष दिलं नाही. परंतू यानंतर एका गावकऱ्याने शेतात फिरत असलेल्या वाघाचा व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर व्हायरल केला. ज्यानंतर वनविभाग तात्काळ सतर्क झाला आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनास्थळाची पाहणी केली आहे. सध्या गावात भीतीचं वातावरण असल्यामुळे वन विभागाने शेतकरी व इतर नागरिकांना घराबाहेर पडताना एकट्याने बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. रात्रीच्या वेळी गरज असल्यास तरच बाहेर पडावं आणि बाहेर पडताना एकट्याने बाहेर न पडता दोन जणांनी हातात टॉर्च आणि काठी घेऊन बाहेर पडावं असा सल्ला वन विभागाने दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अकोला वनविभागाचे अधिकारी जवळा गावात तळ ठोकून आहेत. वनविभागाच्या पथकाने शेतातील वाघाचे ठसेही मिळवले आहेत, त्यामुळे वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले असून त्यामाध्यमातून वाघाचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT