ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा पोलिसांनी एका अट्टल चोराला अटक केली आहे. ३७ वर्षीय चोरट्यावर आतापर्यंत राज्याच्या विविध भागांत ३७ गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक बाब म्हणजे चोरी केलेला माल लपवण्यासाठी या चोरट्याने भाड्याचं घर घेतलेलं असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
या चोरट्यावर एकट्या भिवंडी जिल्ह्यात ३४ गुन्हे दाखल असून त्यात पडघा, गणेशपुरी, भिवंडी शहर, शांतीनगर, भोईवाडा या परिसरांचा समावेश आहेत. उर्वरित तीन गुन्हे हे वाडा, वाशिंद, जव्हार या भागात दाखल असल्याचं कळतंय. सोहेल दिवाकर असं या चोरट्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून वाशिंद आणि भिवंडी परिसरात सहा मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
काही दिवसापूर्वी टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी लंपास झाली होती. याच गुन्ह्याचा टिटवाळा पोलीसांच्या पथकाने तपास सुरु केला असता चोरटा एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. परंतू फुटेज अस्पष्ट असल्यामुळे पोलिसांच्या तपासाला खीळ बसला. हे सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्याच्या मार्फत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. या चोरट्याची पोलिसांनी ओळख पटवली असता हा सराईत गुन्हेगार सोहेल दिवाकर असल्याचे पोलीस तपासात समोर आले. मात्र सोहेल आपली राहण्याची ठिकाण बदलत होता. अखेर हा चोरटा मीरा रोड परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मीरा रोड येथे सापळा रचून सोहेलला बेड्या ठोकल्या आहेत.
वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसवत गाडी वेली दूरवर, नागपुरातला धक्कादायक प्रकार
पोलीस चौकशी दरम्यान सोहेलने टिटवाळा जवळ असलेल्या बल्यानी येथे एक घर भाड्याने घेतले होते. या घरात त्याने चोरी केलेल्या ६ गाड्या लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल व ६ दुचाक्या आतापर्यत हस्तगत केल्या आहेत. सोहेलने पाच दहा नव्हे तर ३७ ठिकाणी दुचाक्या चोरी केल्याचेही तपासात समोर आले आहे. याआधी देखील चोरीच्या गुन्ह्यात सोहेलला अटक झाली होती. मात्र जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा चोरी करण्यास सुरुवात केली होती.
Cyber Crime : ऑनलाईन साईटवरुन टीव्हीचा रिमोट मागवला, तरुणाला बसला ९९ हजार ९९९ रुपयांचा फटका
ADVERTISEMENT