आमदार-खासदारांनंतर आता एकनाथ शिंदेंनी नजर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवर?

ऋत्विक भालेकर

• 03:19 PM • 28 Jul 2022

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena) ४० आमदार आणि १२ खासदार आपल्या बाजूने वळवल्यानंतर आता त्यांची नजर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवरती असल्याची चर्चा आहे. कारण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शिवसेनेचे संस्थापक सदस्य लीलाधर डाके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. हे […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena) ४० आमदार आणि १२ खासदार आपल्या बाजूने वळवल्यानंतर आता त्यांची नजर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवरती असल्याची चर्चा आहे. कारण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शिवसेनेचे संस्थापक सदस्य लीलाधर डाके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. हे दोन्ही नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाते.

हे वाचलं का?

आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चुनाभट्टी येथे लिलाधर डाके यांच्या घरी पोहोचले तर सायंकाळी मनोहर जोशी यांच्या दादर येथील कार्यालयात पोहोचले. सध्या दोन्ही नेत्यांची प्रकृती अस्वस्थ आहे. अशा स्थितीत शिंदे यांनी त्यांना भेटून प्रकृतीची चौकशी केली.

मुख्यमंत्री एकवाथ शिंदे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीला

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर आणि माजी मंत्री रामदास कदम यांचीही भेट घेतली होती. रामदास कदम यांचे पुत्र व आमदार योगेश कदम यांनी यापूर्वीच शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी रामदास कदम यांनीही शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी लगेचच रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी करणारे पत्र जारी केले होते.

एकीकडे शिंदे गट शिवसेनेवर दावा ठोकण्याचा प्रयत्न करत आहे, अशा स्थितीत उद्धव ठाकरेही शिंदे गटाचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडण्याच्या प्रयत्न करत आहेत. आमदारांचे निलंबन आणि पक्षांतरविरोधी कायद्यांतर्गत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट 1 ऑगस्टला सुनावणी करणार आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगानेही दोन्ही गटांना पक्षाशी संबंधित कागदपत्रे आठ ऑगस्टपर्यंत सादर करण्यास सांगितले आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

एकाबाजूने आदित्य ठाकरे मैदानात तर दुसऱ्याबाजून स्वत: मुख्यमंत्री

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही संघटनेला वाचवण्यासाठी राज्यात शिव संवाद यात्रा काढली आहे. पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या जाहीर करत आहेत.

नुकतीच एकनाथ शिंदे यांनी कार्यकारिणीची बैठक घेऊन शिवसेना पक्षातील नेते, उपनेते, सचिव, प्रवक्ते यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यासोबतच शिंदे यांची प्रमुख नेतेपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय ठाणे, पालघर, नवी मुंबई, नाशिक, रायगड परिसरातून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत आहे. एकनाथ शिंदे 30 जुलैपासून नाशिक, औरंगाबाद आणि पुणे दौऱ्यावर जात आहेत. यावरून दोन्ही गटात शिवसेना पक्षावर आपला दावा सिद्ध करण्याची स्पर्धा अधिक तीव्र होत आहे.

    follow whatsapp