लखीमपूर खिरी येथे झालेल्या हत्यांकाडविरुद्ध महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची घोषणा केली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतले तिन्ही घटकपक्ष एकत्र आले असून ११ ऑक्टोबरला राज्यात बंदची घोषणा करण्यात आली आहे. परंतू या बंदला आता व्यापारी वर्गातून विरोध व्हायला लागला आहे.
ADVERTISEMENT
पुण्यासोबतच मुंबईतील काही व्यापारी आणि दुकानदारांनी या बंदला विरोध केला आहे. शेतकऱ्यांना आमचा पाठींबा आहे, पण बंदमध्ये दुकानदारांचा खेचू नका असं आवाहन मुंबई व्यापारी संघाचे अध्यक्ष विरेन शहा यांनी केलं आहे.
बंदमध्ये आम्हाला खेचू नका !
शेतकऱ्यांना आमचा पाठींबा आहे, परंतू उद्या सर्व दुकानं सुरुच राहतील. आम्ही सरकारला आवाहन करतो की या बंदमध्ये दुकानदारांचा खेचू नका. कोरोनानंतर बऱ्याच कालावधीने दुकानं सुरु झाली आहेत. सध्या नोकरांना वेळच्या वेळी पगार देणं जिकरीचं होऊन बसलं आहे. शेतकऱ्यांना आमचा नेहमीच पाठींबा असेल अशी भूमिका विरेन शहा यांनी मांडली.
मुंबईसह ठाण्यातील व्यापारी संघटनांनीही महाराष्ट्र बंदला विरोध दर्शवला आहे. कोरोनाकाळात व्यापार बंद असल्यामुळे झालेलं नुकसान पाहता व्यापारी संघटनांनी ही भूमिका घेतली आहे. बंदच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी बंद राहतील अशी भूमिका तिन्ही पक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यात दुकाने बंद न ठेवण्याची भूमिका –
राज्यातील महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र, पुण्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद न ठेवण्याची भूमिका घेतलीय. सोमवारी दुकाने सुरुच ठेवली जातील. मात्र, शेतकऱ्यांच्या मृत्यूचा निषेध म्हणून आम्ही काळ्या फिती लावू, असं येथील व्यापाऱ्यांनी म्हटलंय. कोरोना काळात व्यापार बंद राहिल्याने सध्या दुकाने बंद ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, असं पुणे जिल्हा रिटेल संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितलं.
महाराष्ट्र बंद मध्ये चित्रीकरण सुरु ठेवावं ! मनसेच्या अमेय खोपकरांची शासनाला विनंती
व्यापाऱ्यांव्यतिरीक्त मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही महाराष्ट्र बंदमध्ये सिनेमा आणि मालिकांचं चित्रीकरण वगळावं अशी विनंती शासनाला केली आहे. त्यामळे सोमवारच्या दिवशी नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लखीमपूर खिरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT