तुझ्यात जीव रंगला मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (१२ नोव्हेंबर) रात्री घडली. हालोंडी इथल्या खाऊ गल्लीतील हॉटेल बंद करून घरी जाण्यासाठी कोल्हापूरच्या दिशेनं जात असताना अभिनेत्री कल्याणी कुरळे जाधव (वय 32) यांचा मृत्यू झाला. मोपेडला ट्रॅक्टरने पाठीमागून जोराची धडक दिल्यानं ही घटना घडली.
ADVERTISEMENT
कोल्हापुरातील राजारामपुरी तेरावी गल्लीतील संयुक्त महाराष्ट्र सोसायटीमध्ये कल्याणी अभिजीत कुरळे-जाधव राहत होत्या. त्या टीव्ही सिरीयलमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत होत्या. त्यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीव्ही सीरियलमध्ये काम केलं होतं.
दहा दिवसांपूर्वी त्यांनी कोल्हापूर सांगली राष्ट्रीय महामार्गावरील हालोंडी गावच्या हद्दीत असणाऱ्या खाऊ गल्लीमध्ये प्रेमाची भाकरी नावाचं हॉटेल चालू केलं होतं. त्या नेहमी रात्री दहाच्या दरम्यान हॉटेल बंद करून घरी जात जायच्या. नेहमीप्रमाणे शनिवारी (१२ नोव्हेंबर) रात्री त्यांनी उशिरा हॉटेल बंद केलं.
कल्याणी कुरळे-जाधव यांचा अपघात कसा झाला?
हॉटेलमध्ये काम करणाऱ्या हालोंडी इथल्या वृद्ध कर्मचारी महिलेसह त्या मोपेडवरून (mho9 fr 3360) घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. कर्मचारी महिला हालोंडी येथील असल्यानं महिलेला हालोंडी फाट्यावर सोडून त्या घरी निघाल्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने मोपेडला पाठीमागून जोराची धडक दिली.
या धडकेत कल्याणी जाधव जोरात रस्त्यावर आदळल्या. ट्रॅक्टरला ट्रॉलीच्या पाठीमागे सिमेंट काँक्रेट मिक्सर मशीन जोडलेले होते ते मशीनचे चाक पोटावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. पोटामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन कल्याणी जाधव यांना सीपीआर मध्ये दाखल केलं. तिथं मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
बीड जिल्ह्यातील ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात
या अपघातास दोषी धरून कसबा बीड इथल्या महादेव बाबुराव पाटील याला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कल्याणी जाधव यांनी झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’, स्टार प्रवाह चॅनेलवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेबरोबरच अनेक मराठी नाटकांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. कल्याणी कुरळे-जाधव यांच्या अपघाती निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT