महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील पुरातन मंकावती तीर्थकुंड हडप प्रकरणी गेल्या ८ दिवसापासून फरार असलेला आरोपी देवानंद रोचकरी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. रोचकरी याला मुंबई मंत्रालय परिसरातून अटक करण्यात आली. त्यामुळे रोचकरीला मंत्रालय प्रेम घातक ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात मंत्रालय हे केंद्रबिंदू ठरलं.
ADVERTISEMENT
तुळजापूर येथील पुरातन मंकावती तीर्थकुंड हडप केल्या प्रकरणी फरार असलेला रोचकरी मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशाने तुळजापूरचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने रातोरात मुंबईत जाऊन रोचकरीला बेड्या ठोकल्या.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल १ हजार २४४ चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण, तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.
रोचकरीला अटक केल्यावर त्याची नोंद मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात करण्यात आली. रोचकरीला उस्मानाबाद पोलीस तुळजापूर येथे घेऊन येत आहेत. तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल रोटे, पोलीस हवालदार अजय सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते आदेश
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंकावती प्रकरणी ४ मुद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याला रोचकरीने मंत्रालयातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्थगिती आणली व त्यानंतर सुनावणीअंती मंत्री शिंदे यांनी ही स्थगिती उठवली होती. त्यामुळे रोचकरी बंधूविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यावर पुढील कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी रोचकरीने पुन्हा मोठ्या आत्मविश्वासानं मंत्रालय गाठलं होतं, मात्र तिथेच त्याला पोलिसांनी शिताफीनं अटक केली.
मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी देवानंद रोचकरी व त्याचा भाऊ बाळासाहेब रोचकरी यासह अन्य आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे. देवानंद रोचकारीला अटक झाली असून, बाळासाहेब रोचकरी फरार आहे. रोचकरीला अटक केल्यानंतर प्रकरणाच्या तपासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचं मानलं जात आहे.
देवानंद रोचकारीवर अनेक गंभीर गुन्हे
देवानंद रोचकरीवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे नोंद असून त्यात सावकारी, शासकीय जमीन हडप करणे व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून अतिक्रमण करणे, नागरिक व शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. रोचकरी याच्यावर यापूर्वी ३ वेळा हद्दपारची कारवाई करण्यात आली होती.
ADVERTISEMENT