मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने केल्याची धक्कादायक आणि खळबळ उडवून देणारी घटना काल (शनिवारी) संध्याकाळी घडली. शुटिंगनंतर मेकअप रुममध्येच तुनिषाने स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला. सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रीनं टोकाचं पाऊल उचलल्यानं मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणात वळीव पोलिसांनी तुनिषाचा सह कलाकार आणि एक्स बॉयफ्रेंड शीजान मोहम्मद खान याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणात तुनिषा शर्माच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. तिच्या आईने तक्रारीत आरोप केलाय की, ‘तुनिषा शर्मा तिचा शीजान मोहम्मद खानसह रिलेशनशिपमध्ये होती. परंतु 15 दिवसांपूर्वी शीजानने तुनिषासोबत ब्रेकअप केलं. तिला सोडून दिल्यामुळे ती नैराश्यामध्ये होती. त्याच कारणामुळे तिने नायगाव कामण येथील सेटवरील रेस्ट रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीजान मोहम्मद खानला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिसांचा या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे. अशातच या प्रकरणात लव्ह जिहादचाही संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत भाजप नेते आणि आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार राम कदम म्हणाले, तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल आणि जर लव जिहादचे प्रकरण असेल तर त्याची चौकशी केली जाईल. त्यामागे कोणत्या संघटना आहेत आणि कोणी हे षडयंत्र रचलं आहे हे शोधून काढलं जाईल.
या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, तुनिषा शर्माला पॅनिक अटॅक आला होता. त्यानंतर तिने डॉक्टरांना दाखवलं होतं. डॉक्टरांनी तुनिषाच्या आईला तिची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचं आणि तिच्या डोक्यात आत्महत्येचे विचार येत असल्याचं सांगितलं होतं. यातूनच तिने शनिवारी आत्महत्या केली.
ADVERTISEMENT