लॉकडाऊनमधलं पर्यटन दोन तरूणांच्या जिवावर बेतलं आहे. कारण वसईच्या सुरूची समुद्र किनाऱ्यावर मजा करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. नालासोपारा या ठिकाणी राहणारं कुटुंब हे सुरूची समुद्र किनाऱ्यावर आलं होतं. त्यातील काही तरूण दुपारनंतर समद्र किनारी पोहण्यास गेलं. त्यावेळी समुद्र खवळलेला होता. पाण्याच्या लाटांसोबत यामधले दोन तरूण खेचले गेले. तसंच पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. अजित विश्वकर्मा आणि रणजीत विश्वकर्मा अशी या दोघांची नावं आहेत.
ADVERTISEMENT
अजित विश्वकर्मा हा 15 वर्षांचा होता तर रणजीत विश्वकर्मा हा 20 वर्षांचा होता. हे दोघेही चुलत भाऊ आहेत अशीही माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी या दोघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास दोघांचे मृतदेह मिळाले. वसई पोलिसांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. वसई पोलीस अकस्मात मृत्यूंची नोंद या प्रकरणी करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात पिकनिकला जाणं हे या दोन मुलांच्या जिवावर बेतलं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
कोव्हिड काळात आम्ही आणि आमच्या शेजारचे काही लोक समुद्र किनारी आलो होतो. आम्हाला आता त्याचा पश्चात्ताप होतो आहे की आम्ही उगाच फिरायला आलो असंच वाटतं आहे. जी दोन मुलं बुडाली त्यांच्यासोबत त्यांचे वडील होते पण ते पाच मिनिटांसाठी समुद्राबाहेर आले होते आणि नेमकी तेव्हाच ही दुर्घटना घडली. कोव्हिड काळात आम्ही इथे यायला नको होतं हे आम्हाला मान्य आहे पण इथे समुद्र किनारी जर कुणी बुडत असेल तर लाईफ गार्डसारखी काहीही व्यवस्था नाही. जर ती असती तर आमच्या शेजारी राहणारी दोन मुलं बुडाली नसती. त्यांचा मृत्यू झाला नसता. आमची चूक आम्हाला मान्य आहे पण सरकारने या ठिकाणी लाईफ गार्डही ठेवले पाहिजेत जेणेकरून अशी दुर्घटना यापुढे घडणार नाही असंही या मुलांसोबत पिकनिकला आलेल्या त्यांच्या शेजाऱ्याने सांगितलं आहे. रणजीत दोन दिवसांनी त्याच्या गावाला जाणार होता. त्याआधी बाहेर फिरून यावं या उद्देशाने आम्ही इथे आलो होतो. पण आता रणजीतच आम्हाला सोडून गेला आहे असंही या शेजऱ्याने सांगितलं.
ADVERTISEMENT