राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांकडून राज ठाकरेंची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. काही दिवसांपूर्वीच स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. मात्र, उदय सामंत यांची ही भेट आणखी एका कारणामुळे महत्वाची असणार आहे. हे कारण म्हणजे, विधानसभा निवडणुकीतील शिवसेना आणि मनसेमध्ये लढत झाली होती. त्यावेळी अनेक वेगवेगळ्या चर्चा झाल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं दिसलं होतं. त्यामुळे आता ही कटुता कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का? असा सवाल उपस्थित होतोय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> New India Cooperative Bank च्या सीईओला पोलिसांकडून अटक, 122 कोटींच्या घोटाळ्यात हात?
राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीत नेमकी चर्चा काय झाली, याबद्दलची माहिती समोर आलेली नसली, तरी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेला महायुतीसोबत घेण्याचा महायुतीमधील नेत्यांचा आणि विशेषत: शिवसेनेचा प्रयत्न आहे का हे पाहणं महत्वाचं असेल.
राज ठाकरे-एकनाथ शिंदेंमध्ये विसंवाद?
विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका भाजप नेत्यांनी घेतली होती, पण महायुतीमधील इतर पक्षांकडून, विशेषत: शिवसेनेकडून तसा प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल राज ठाकरे यांना सवाल केला असता राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "तुम्ही उमेदवार देणार नसाल, तर मी अमितला उभं करेन अशी माझी अटच नव्हती. मी अमितला म्हटलं की जिथे तु वाढलाय तिथे, दादर-माहिमध्ये निवडणूक लढ. त्याने किनारा साफ करण्याची वगैरे कामंही केली. आम्ही पहिल्या यादीत नाव घोषित केल्यावर हे सर्व सुरू झालं.समोरच्यांना वाटत असेल की, त्यांनी उमेदवार देऊ नये तर ते त्यांच्या मनाने करावं. तुम्हाला वाटत असेल तर करा, नाहीतर नका करू, ही जबरदस्ती होऊ शकत नाही. मी महायुतीतला घटक नाही, लोकसभेला पाठिंबा दिला होता वगैरे गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला हव्या होत्या, मी नाही."
तुमची पहिली निवडणूक, माझी पाचवी...
हे ही वाचा >> "ज्यादिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला...", मराठी साहित्य संमेलनात डॉ. तारा भवाळकरांचं सर्वात मोठं विधान
पुढे बोलताना एकनाथ शिंदेंकडून आलेल्या "भांडूपच्या ऑफरबद्दल विचारलं असता, राज ठाकरे म्हणाले होते की, तुम्ही मला का ऑफर करता? तुमची पहिली निवडणूक आहे, माझी पाचवी निवडणूक आहे, सत्तेत बसलात म्हणून तुम्ही मला ऑफर नाही देऊ शकत" असं म्हणत राज ठाकरेंनी रोखठोकपणे आपली भूमिका मांडली होती. एकूणच या घडामोडींनंतर दोन्ही नेत्यांमध्ये विसंवाद निर्माण झाल्याची चर्चा होती. त्यामुळे आता उदय सामंत यांच्या भेटीनंतर पुन्हा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये समन्वय निर्माण होणार का हे पाहणं महत्वाचं असेल.
ADVERTISEMENT
