शिवसेना कुणाची या वादात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झालेत. अशातच मैत्रीदिनानिमित्त दोघांनी एकत्र यावं, असंही म्हटलं जातंय. या सगळ्यातच ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी तारीख आणि जागाही फिक्स झालीय. आणि याचं कनेक्शन थेट शिंदेंसोबत सलोख्याचे संबंध असलेल्या ठाकरेंच्या विश्वासू माणसासोबत जोडलं गेलंय.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंना पायउतार करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आणि केवळ मुख्यमंत्रीपदाच्याच खुर्चीवर बसले नाही, तर आता शिंदेंनी शिवसेनाही ताब्यात घेण्याची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्टातही लढाई सुरू झाली आहे. पण या सगळ्यांमध्ये ठाकरे-शिंदेंना एकत्र आणणारी एक घटना घडली आहे.
नवी मुंबईमध्ये तिरुपती मंदिर उभारण्यात येणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र सरकारनं तिरुमला तिरुपती देवस्थानाला जमीनही दिलीय. गेल्या एप्रिल महिन्यात जमीन मिळाल्यावर आता तिथे भूमिपूजनही होणार आहे. आणि याच भूमिपुजनासाठी ठाकरे आणि शिंदेंना निमंत्रण देण्यात आलं आहे.
‘लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार’; देवेंद्र फडणवीसांचं युतीबद्दल मोठं विधान
देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ५ ऑगस्ट रोजी शिंदे, फडणवीस, ठाकरेंची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर देवस्थान समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. सत्कार करून भूमिपूजनाचं निमंत्रण दिलं. तसंच फडणवीस दाम्पत्याचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी देवस्थानाचे अध्यक्ष वाय व्ही. सुब्बारेड्डी, सीईओ धर्मा रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. समितीनं आदित्य ठाकरेंनाही भूमिपूजनाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलंय. यावेळी समितीचे सदस्य आणि उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे : शिवसेना फुटीवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणार?
नार्वेकरांचे शिंदेंसोबतही सलोख्याचे संबंध असल्याचं म्हटलं जातंय. आणि हाच सलोखा ठाकरे-शिंदेंना एकत्र आणणार का, हे बघायला हवं. येत्या २१ ऑगस्ट रोजी नवी मुंबईत तिरुमला तिरुपती देवस्थानातर्फे बालाजी मंदिराचं भूमिपुजन होणार आहे. आणि याच निमित्तानं सत्तासंघर्षानंतर पहिल्यांचा ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालीय.
शिंदेंनी हिंदुत्वावरून ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे शिंदेंसाठी भूमिपुजनाला जाणं बंधनकारक झालंय, तर उद्धव ठाकरेंसाठी आपण हिंदुत्ववादीच आहोत, हे दाखवून देण्यासाठी ही एक नामी संधी चालून आली आहे, पण खरंच मनभेद, मतभेद झालेले ठाकरे-शिंदे एकमेकांची तोंड बघणार का, की वेगवेगळ्या वेळी उपस्थिती लावणार हे 21 ऑगस्ट रोजीच दिसेल.
ADVERTISEMENT