मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत. ज्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली त्यांची पक्षाच्या पदावरुन हकालपट्टी केली जात आहे, आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्या नियुक्ता केल्या जात आहेत. आज उद्धव ठाकरेंनी जळगाव जिल्ह्याच्या सहसंपर्क पदावर गुलाबराव वाघ यांची नियुक्ती केली आहे. .याअगोदर या पदावर बंडखोर आमदार तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) होते. त्यामुळे आता चर्चा अशी आहे की जळगावमध्ये शिंदेंच्या गुलाबरावांसमोर ठाकरेंचे गुलाबराव उभे राहिले आहेत.
ADVERTISEMENT
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आज मातोश्रीवरती वाशिम, जळगाव जिल्ह्यातून शिवसैनिक आले होते. उद्धव ठाकरेंनी या शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले ” गेलेल्या सर्वांना प्रेमानं, मायेनं निष्ठेचं दूध पाजलं पण औलाद गद्दाराची गद्दारच राहिली. भाजपनं जळगावमध्ये एक गुलाब पाहिलाय पण आता सैनिकाचे काटे त्यांनी बघायचे आहेत. एक गुलाब गेला तरी दुसरा आपल्याकडे आहे”.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी यावेळी सदस्य नोंदणी, आणि पदाधिकाऱ्यांना शपथपत्र देण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की आपण पक्षाच्या लढाई सोबत वेगळी कायदेशीर लढाई लढत आहोत, त्यामुळे मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे. गुलाबराव पाटील शिंदे गटात गेल्यानंतर आता जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले ”गद्दार बोलताना बैलाला त्रास होईल असं बोलू नका. बैल शेतकऱ्यांचा राजा आहे. कालच नागपंचमी झाली असं बोलतात की नागाला किती दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच. या सर्वाना निष्ठेचं दूध पाजलं पण औलाद गद्दार निघाली. जळगावमध्ये एक गुलाब गेले, दुसरे गुलाबराव वाघ आपल्या सोबत आहेत. आता मी राज्यभर फिरणार आहे तेव्हा सविस्तर बोलेन.”
जळगावमध्ये शिंदेंच्या गुलाबरावांसमोर ठाकरेंचे गुलाबराव
जळगाव जिल्ह्यामध्ये गुलाबराव पाटील हे मागच्या अनेक वर्षापासून शिवसेनेची धगधगती तोफ होती. अनेक वर्ष त्यांनी शिवसेना जळगाव जिल्ह्यात जिवंत ठेवली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुलाबराव पाटलांच्या खांद्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. परंतु त्यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर प्रचंड मोठ्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. गुलाबराव पाटील जरी शिंदे गटात गेले असले तरी त्यांच्या समोर उद्धव ठाकरेंनी गुलाबराव वाघ यांना उभे केले आहे. आता जळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ जळगावचे सेनेचे पुढील उमेदवार असणार अशी चर्चा आहे.
ADVERTISEMENT