महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक कुठलं नाव चर्चेत असेल तर ते उद्धव ठाकरे यांचं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे आत्ता ज्या परिस्थितीतून जात आहेत ती परिस्थिती. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण गोठवला आहे. उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिलं आहे. हे चिन्ह घेऊन आता उद्धव ठाकरे अंधेरीची पोटनिवडणूक जिंकतात का? तसंच यापुढे पक्ष आणखी वाढवतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ. उद्धव ठाकरे हे राजकारणात तसे फारच उशिरा आले. मात्र त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास जाणून घेण्यासारखा आहे.
ADVERTISEMENT
उत्तम फोटोग्राफर ही उद्धव ठाकरे यांची पहिली ओळख
ठाकरे घराण्यात प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कला आहे हे आपण पाहात आलो आहे. बाळासाहेब ठाकरे हे उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांचे बंधू आणि राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे हे उत्तम संगीतकार होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा वारसा पुढे राज ठाकरे यांनी सुरू ठेवला. उद्धव ठाकरे हे मात्र उत्तम फोटोग्राफर म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांनी त्यांचं शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिरातून घेतलं आहे तर पुढे ते जे.जे. इन्स्टिट्युट ऑफ अप्लाईड आर्टमधून पदवीधर झाले. उद्धव ठाकरेंना फोटोग्राफीची खूप आवड आहे. महाराष्ट्र देशा आणि पाहावा विठ्ठल ही त्यांची दोन छायाचित्रांवरची पुस्तकंही प्रसिद्ध आहेत.
काय आहे महाराष्ट्र देशा आणि पाहावा विठ्ठल या दोन छायाचित्र पुस्तकांमध्ये?
महाराष्ट्र देशा या छायाचित्र पुस्तकात उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची एरियल फोटोग्राफी केली आहे. तर पाहावा विठ्ठल या छायाचित्र पुस्तकात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला एकतेचा आणि समानतेचा संदेश देणारी वारी टीपली आहे. या दोन्ही पुस्तकांमधली त्यांनी काढलेली छायाचित्रं त्यांची कॅमेरावरची पकड किती जबरदस्त आहे हे दाखवतात.
ठाकरे बंधूंबाबत द कझिन्स ठाकरे हे पुस्तक लिहिणारे धवल कुलकर्णी यांच्या पुस्तकात उल्लेख आहे तो असा की १९८५ ला शिवसेनेने मुंबई महापालिका काबीज केली. त्यावेळी प्रचारात उद्धव ठाकरेंची भूमिका महत्त्वाची होती. अर्थात तेव्हा त्यांनी जाहीररित्या राजकारणात प्रवेश केला नव्हता.
१९९१-९२ च्या दरम्यान राजकारणात उद्धव ठाकरेंचा प्रवेश
१९९१-९२ च्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी राजकारणात प्रवेश केला. अर्थात त्यांच्या आधीपासून राज ठाकरे हे कार्यरत होतेच. राज ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आक्रमक भाषण करणारे तर उद्धव ठाकरे हे शालीन, शांत स्वभावाचे. संयम बाळगून पुढे जाणारे. दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये राजकारणातले दोन भिन्न गुण होते. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी एका मुलाखतीत हे सांगितलं होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची राजकारण करण्याची शैली पूर्णपणे वेगळी आहे. रमेश किणी हत्या प्रकरण घडलं ते युतीचं सरकार आलेलं असताना. तोपर्यंत राज ठाकरे हे शिवसेनेत सेटल झाले होते पण उद्धव ठाकरे हे मात्र अंदाज घेत आपल्या शैलीने राजकारण करत होते.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कधी पडली?
१९९१-९२ च्या दरम्यान नागपूरमध्ये बेरोजगारीचा मुद्दा पुढे करून शिवसेनेने मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चात राज ठाकरेंना हे सांगण्यात आलं की उद्धव ठाकरेही तुमच्यासोबत भाषण करतील. यामुळे राज ठाकरे चिडले.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वादाची ठिणगी पडली ती याच प्रसंगाने असं म्हटलं जातं.
रमेश किणी हत्या प्रकरणानंतर राज ठाकरे साईड ट्रॅक
रमेश किणी हत्या प्रकरण युतीचं सरकार आलेलं असताना म्हणजेच १९९६ मध्ये घडलं त्यानंतर राज ठाकरे हे काहीसे साईड ट्रॅक झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे राजकारणात जास्त सक्रिय झाले. १९९७ च्या वेळी महापालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंनी थेट सहभाग घेण्यास सुरूवात केली आणि तिथून खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेंची राजकारणात एंट्री झाली. २००२ च्या महापालिका निवडणुकांची धुरा उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर होती. त्यावेळी राज ठाकरेंनी सुचवलेल्या नावांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे आधीच एकटे पडलेले राज ठाकरे आणखी एकटे पडत गेले आणि अस्वस्थ होत गेले.
२००३ चं महाबळेश्वरचं अधिवेशन आणि उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाले
२००३ ला महाबळेश्वरला शिवसेनेचं अधिवेशन झालं. या अधिवेशनात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव मांडला. जो एकमताने संमत झाला. बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा ही बाब समजली तेव्हा मी पक्षात घराणेशाही राबवत नाही, मला हा निर्णय पसंत नाही. तुम्हाला जर हा निर्णय बदलायचा असेल तर बदलू शकता असं सांगितलं. मात्र सगळ्यांनी उद्धव ठाकरेंच्या नावाला पसंती दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले.
उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर शिवसेनेला दोन मोठे धक्के
उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले. पहिला होता नारायण राणेंचा. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं. त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली त्यानंतर २००६ मध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. त्यानंतर त्यांनी मनसेची स्थापना केली आणि आपला मार्ग निवडला. एकाच पक्षात असलेल्या दोन भावांमध्ये दुहीची बीजं रोवली गेली ती कायमचीच.
नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी आणि राज ठाकरेंनी पक्ष सोडणं हे दोन मोठे धक्के शिवसेनेला पचवावे लागले. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राजकारणाची आक्रमक पद्धत बदलण्यास सुरूवात केली. संयमी राजकारण करण्यास सुरूवात केली.
धवल कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना नारायण राणेंच्या हकालपट्टीनंतर आणि राज ठाकरेंनी पक्ष सोडल्यानंतर महापालिकेची सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण त्यामध्ये ते यशस्वी झाले. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी उत्तम पद्धतीने केली त्यामुळेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे ६३ आमदार निवडून आणू शकले.
बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख झाले
बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू १७ नोव्हेंबर २०१२ ला झाला. त्यानंतर स्वतःला शिवसेनाप्रमुख हे पद बाळासाहेब ठाकरेंचं होतं. ते पद न घेता उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष प्रमुख हे पद निर्माण केलं. त्यानंतर ते शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून ओळखले जाऊ लागले. २०१४ ला त्यांनी मिळवलेलं यश मोदी लाटेच्या तुलनेत चांगलं म्हणता येईल.
बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सगळ्यांच्या पुढाकाराने झालेली युती सडली असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी २०१७ मध्ये केलं होतं. २०१४ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती निवडणुकीच्या आधी तुटली होती. एकनाथ खडसे यांनी त्यासंदर्भातली घोषणा केली होती. तसंच निवडणुकांच्या नंतर ही युती झाली होती. मात्र २०१४ ते २०१९ या पूर्ण पाच वर्षांच्या कालावधीत युतीमध्ये धूसफूस सुरूच होती. भाजपच्या जागा जास्त आल्या होत्या. तसंच देशात भाजपची एकहाती सत्ता आली होती. त्यामुळे भाजपचं पारडं जड झालं होतं. पण १२२ आमदार निवडून आले तरीही भाजपने बहुमताची संख्या गाठली नव्हती. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला आणि शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर खाऊन टाकली. त्यावेळी उद्धव ठाकरे हे शरद पवारांवर चिडले होते.
२०१९ ला महाविकास आघाडीचा प्रयोग आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले
२०१९ ला महाविकास आघाडीचा न भूतो न भविष्यती असा प्रयोग झाला. मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरून शिवसेना आणि भाजप यांचं फाटलं. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर त्या सरकारचे मुख्यमंत्री होते उद्धव बाळासाहेब ठाकरे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर कोरोनाची साथ आली. कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन करावा लागला. या सगळ्या कालावधीत उद्धव ठाकरेंनी कुटुंबप्रमुखाप्रमाणे महाराष्ट्र सांभाळला असं त्यांच्याविषयी कायमच बोललं जातं. मात्र भाजपकडून त्यांच्यावर आणि त्यांच्या धोरणांवर तसंच विविध निर्णयांना स्थगिती देण्यावर सातत्याने टीका करण्यात आली आहे.
२०१९ नंतर भाजपशी थेट उभा दावा
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपशी थेट उभा दावा घेतला. सामनातले अग्रलेख असतील किंवा दसरा मेळावा असेल किंवा अगदी कोरोना काळात केलेलं फेसबुक लाईव्ह असेल. मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर टीका करणं अजिबात सोडलं नाही. त्यांच्या साथीला होते संजय राऊत. तसंच शिवसेनेत्या इतर नेत्यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडली. ज्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्या थेट शत्रुत्वच निर्माण झालं.
२१ जून २०२२ ला शिवसेनेत फूट
२१ जून २०२२ ला शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे साधारण २० आमदारांसह नॉट रिचेबल होते. त्यानंतर आमदारांची संख्या ४० झाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतल्या निवडून आलेल्या ५६ आमदारांपैकी ४० आमदार गेले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. अत्यंत भावनिक आवाहन करत त्यांनी हे पद सोडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. पुढे काय काय गोष्टी घडल्या ते महाराष्ट्राला ठाऊक आहेच.
शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला
शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे झाला. कारण छगन भुजबळ, नारायण राणे यांचं बंड असेल किंवा राज ठाकरेंनी शिवसेना सोडणं असेल या सगळ्या नेत्यांनी जेवढा फरक पडला नाही तेवढा फरक या बंडामुळे पडला आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट अशी विभागली गेली. अर्थात उद्धव ठाकरेंकडून सातत्याने शिंदे गटाचा उल्लेख हा मिंधे गट असाच केला जातो आणि त्यांना गद्दारही म्हटलं जातं.
आता उद्धव ठाकरे काय करणार?
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातला वाद निवडणूक आयोगाकडे गेला त्यावेळी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवलं तसंच नावही गोठवलं. त्यानंतर आता ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे तर या गटाचं चिन्ह आहे मशाल. दुसरीकडे शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे तर चिन्ह मिळालं आहे आता नव्या चिन्हासह पक्ष वाढवण्याचं आणि अंधेरी पोटनिवडणूकच नाही तर येणारी प्रत्येक निवडणूक जिंकण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. या आव्हानांना ते कसं सामोरं जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
उद्धव ठाकरेंचा सगळा प्रवास जर पाहिला तर तो सुरूवातीला तो काहीसा चांगला आणि त्यानंतर संघर्षमय राहिला आहे. खासकरून बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना सांभाळण्यात त्यांना २०२२ पर्यंत यश मिळालं. मात्र आता शिवसेनेत जी दोन शकलं झाली आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना अग्नीपरीक्षा द्यायची आहे त्यातून ते योग्यप्रकारे बाहेर पडतील का हे येणारा काळ ठरवू शकतो.
ADVERTISEMENT