मी आणि मार्मिकने महाराष्ट्राला नवं रुप दाखवलं –उद्धव ठाकरे

मुंबई तक

• 12:42 PM • 13 Aug 2021

‘मार्मिक साप्ताहिकाला आणि मला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यातही आमच्यातील एक साम्य म्हणजे मार्मिकने आणि मी महाराष्ट्राला नवं रुप दाखवलं. मार्मिक नव्या रुपात येतोय आणि मी सुद्धा जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो’, असं मिश्कील भाष्य करत मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्मिकच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला. शिवसेनेचं मुखपत्र आणि प्रसिद्ध व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकचा वर्धापन […]

Mumbaitak
follow google news

‘मार्मिक साप्ताहिकाला आणि मला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यातही आमच्यातील एक साम्य म्हणजे मार्मिकने आणि मी महाराष्ट्राला नवं रुप दाखवलं. मार्मिक नव्या रुपात येतोय आणि मी सुद्धा जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो’, असं मिश्कील भाष्य करत मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्मिकच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला.

हे वाचलं का?

शिवसेनेचं मुखपत्र आणि प्रसिद्ध व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकचा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आता भाषण करण्याची सवय मोडली आहे. दोन वर्षापासून कोरोनाचं शुक्लकाष्ठ मागे लागलं आहे, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने साजरा करावा लागत आहे. मार्मिकबद्दल एक सादरीकरण केलं गेलं. हे बघताना मला प्रमोद नवलकरांची आठवण आली. मार्मिकच्या वाटचाली शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

‘काळ नेहमी आव्हानात्मक असतो. तेव्हाही होता आणि आताही तसाच आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मावळा या नावाने व्यंगचित्र काढायचे. हा लढा महाराष्ट्राने यशस्वी केला. मुंबई मिळवली. मराठी माणसाला आळशी म्हटलं जातं, पण लढण्यासाठी मराठी माणसानेच हिंमत दाखवली. मराठी माणसाच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण असायला हवेत. त्या विचाराने मार्मिकचा जन्म झाला’, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. ‘मराठी माणसावर परप्रांतीय आक्रमण करताना दिसत होते. यातूनच एक संघटना जन्माला आली, तिचं नाव शिवसेना. या व्यंगचित्रातून ही चळवळ उभी राहिली. बाळासाहेबांनी व्यंगचित्रांच्या जोरावर एक संघटना उभी केली,’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि साप्ताहिक मार्मिकच्या आठवणींना उजाळा दिला. ‘बाळासाहेबांनी मार्मिक साप्ताहिक सुरू केलं, पण त्या काळात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. मुद्रकाने ऐनवेळी छपाईस नकार दिला. या नकारानंतर बाळासाहेबांनी यावर उपाय शोधत आवाज नावाच्या मासिकाच्या संपादकांनी मार्मिकची छपाई करण्यास होकार दिला’, असं सुभाष देसाई म्हणाले.

‘मार्मिकसाठी पैसा उभा करण्यासाठी बाळासाहेबांनी बँकेकडे कर्ज मागितलं. बँकेनं कर्ज देण्यास नकार दिला, पण अशाही परिस्थितीतही बाळासाहेबांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मार्मिकच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन केलं. त्यानंतरच्या प्रवासातही अनेक अडथळे आले; पण तरीही मार्मिकची वाटचाल सुरूच राहिली’, अशी आठवण सुभाष देसाई यांनी सांगितली.

    follow whatsapp