‘छत्रपतींचा अपमान करणारा माणूस पंतप्रधानांच्या व्यासपीठावर असेल, तर…’, उद्धव ठाकरेंनी शिंदेंनाही सुनावलं

मुंबई तक

11 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:24 AM)

“गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सातत्याने लोक येताहेत. काही जणांना असं वाटतं की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपली आणि संपलेल्या काळात तुम्ही आलात. असं नाहीये. ज्यांना असं वाटतंय की आम्ही म्हणजे शिवसेना होतो आणि आम्ही शिवसेना संपवली म्हणणारे ते लोक संपले आहेत. फक्त ते जगजाहीर होणं बाकी आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी […]

Mumbaitak
follow google news

“गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सातत्याने लोक येताहेत. काही जणांना असं वाटतं की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपली आणि संपलेल्या काळात तुम्ही आलात. असं नाहीये. ज्यांना असं वाटतंय की आम्ही म्हणजे शिवसेना होतो आणि आम्ही शिवसेना संपवली म्हणणारे ते लोक संपले आहेत. फक्त ते जगजाहीर होणं बाकी आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह ठाकरे गटातील आमदार आणि नेत्यांना सुनावलं.

हे वाचलं का?

ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाकरेंनी शिंदेंना लक्ष्य केलं. “मी म्हणजे शिवसेना, मी काही तरी केलंय. हे काम मीच केलं. मी नसतो, तर झालंच नसतं, असं काही नसतं. कारण कुठल्याही एका व्यक्तीवर जग अवलंबून नसतं. आज सुद्धा पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांनी मोठंमोठ्या विकास कामांचा शुभारंभ केला. त्यात काही जण म्हणाले, हे मीच केलं. अरे नाही बाबा… सरकार येत जात असतं. आतापर्यंत महाराष्ट्रात किती मुख्यमंत्री झाले. याच्या पुढे किती होणार आहेत. याचा अर्थ असा नाही की मी होतो तेव्हाच झालं. याच्या आधी झालं नाही आणि याच्या नंतरही होणार नाही. मी म्हणजे सगळं काही असा समज कुणी करून घेऊ नये. तो समज काही जणांचा झालेला आहे”, अशा शब्दात ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पलटवार केला.

मोदींच्या व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी; ठाकरेंचा सवाल

“17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा महाराष्ट्रद्रोहीविरुद्ध मोर्चा आहे. राजकारणात सभा, मोर्चे आंदोलन होतातच. हा मोर्चा महाराष्ट्राची अवहेलना होतेय. फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपतींचा महाराष्ट्र आणि त्यांचाच अपमान करणारा माणूस राज्यपाल पदावर असेल, तोच माणूस पंतप्रधानांच्या व्यासपीठावर असेल, तर महाराष्ट्राने नेमकं समजायचं काय?” असा सवाल ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मोदींना केला.

एकनाथ शिंदे लिहून दिलेलं स्क्रिप्ट वाचतात, उद्धव ठाकरेंनी डिवचलं

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटलाय. महाराष्ट्राच्या बाजूने कुणीच बोलत नाहीये. कर्नाटकाचे मुख्यमंत्री अतिशय मस्ती, माज आल्यासारखं बोलताहेत. आमचे मुख्यमंत्री लिहून दिलेलं स्क्रिप्ट वाचतात. सर्वोच्च न्यायालयात हा विषय आहे, असं सांगतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट जसा महाराष्ट्र बघतोय, तसं कर्नाटकाने बघायला काय हरकत आहे? पण, त्यांनी आता सोलापूर, अक्कलकोटवरही हक्क सांगितलाय. मग महाराष्ट्राला कुणी वाली आहे की नाही?” असा टोला ठाकरेंनी शिंदेंना लगावला आहे.

“केंद्रात भाजपचं सरकार आहे. कर्नाटकात भाजपचं सरकार आहे. महाराष्ट्रात मिंधे असले, तरी कुणाचे मिंधे आहेत? भाजपचेच. मग तिन्ही ठिकाणी भाजप आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांचे नेते आता एक आहे, कारण आपल्या मिंध्यांचे एकेकाळी बाळासाहेब नेते होते, आता झालेत मोदी. बोम्मईंचा नेतेही मोदी आहेत, तर बोम्मई एवढे जोरात बोलतात, मग आमचे मुख्यमंत्री का बोलत नाहीत”, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना खिंडीत घाटण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : मोदी-शाहांना ठाकरेंनी काय केला सवाल

“राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांनी अमित शाहांची भेट घेतली. तरीही बोम्मई म्हणाताहेत अमित शाहांना भेटून काय होणार आहे? म्हणजे तुम्ही गृहमंत्र्यांना मानायला तयार नाहीत, पंतप्रधानांना मानता की नाही तेही जाहीर करावं. अशा वेळी पंतप्रधान महाराष्ट्राच्या बाजूने काही बोलणार आहे की नाही? कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना समज देणार आहेत की नाही?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांना केलाय.

    follow whatsapp