मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करण्यात आला असल्याने पुढील आदेशापर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य-बाण हे पक्षचिन्ह गोठवलं आहे. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही, असे आदेश आयोगाने दिले आहेत. शनिवारी रात्री उशीरा आयोगाने याबाबतचे आदेश जारी केले.
ADVERTISEMENT
यासोबतच अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना तात्पुरत्या स्वरुपात नवीन नाव, नवीन चिन्ह या गोष्टींची माहिती १० ऑक्टोबरपर्यंत आयोगाला कळविणास सांगितले आहे. दोन्ही गटांना नावाचे आणि मुक्त चिन्हामधील चिन्हांचे आपल्या आवडीनुसार आणि प्राथमिकतेनुसार तीन पर्याय १० ऑक्टोबर पर्यंत देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. यानंतर आयोगाकडून दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह देण्यात येणार आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे यांची की उद्धव ठाकरे यांची? दोन्ही गटांनी दावा केल्याने हा वाद निवडणूक आयोगात पोहचला आहे. हा वाद सोडविण्यासाठी आयोगाने दोन्ही बाजूंना कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवार आणि शनिवार अशा दोन्ही दिवशी शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकीलांनी कागदपत्र सादर केली होती. दरम्यान ठाकरे गटाकडून आणखी चार आठवड्यांच्या अवधीची मागणी करण्यात आली होती.
ठाकरे गटाचे वकील सनी जैन म्हणाले होते, काल आम्ही आमचे प्राथमिक उत्तर दाखल केले आणि आजही आम्ही उत्तर दाखल केले. आम्ही आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणींची शपथपत्रं सादर केली आहेत. तसेच 2.5 लाखांहून अधिक शपथपत्रं लवकरच सादर केली जातील. 10-15 लाख प्राथमिक सदस्यांचीही शपथपत्र दाखल केली जाणार आहेत. ही शपथपत्रं आणि इतर गोष्टी विहित नमुन्यात सादर करण्यासाठी 4 आठवड्यांचा अवधी मागितला आहे.
तातडीच्या सुनावणीला विरोध :
एकनाथ शिंदे यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती. त्याला उत्तर दाखल करताना ठाकरे गटाच्या वतीने विरोध करण्यात आला होता. शिंदे गट पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवणार नाही. मग चिन्हाची मागणी कशासाठी करत आहे चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत जैसे थे स्थिती ठेवावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून मात्र त्यापूर्वीच आयोगाने शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह गोठवलं आहे.
ADVERTISEMENT